Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर!

'आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा, घरी लग्न आहे... चार दिवसांनी घेऊन जाऊ', मुलाचं वृद्धाश्रमाला उत्तर; बापाला अश्रू अनावर!


'आईचा मृतदेह घरी आणू नका, माझ्या मुलाचं लग्न आहे. मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा. चार दिवसांनी लग्न झाल्यावर अंतिम संस्कार करू', असं एका पोटच्या मुलाने आपल्याच आईबाबतीत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या मुलांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं, त्याच मुलांनी वृद्ध आईचा मृत्यूनंतरही स्वीकार करण्यास नकार दिला. मुलांनी मृतदेह नाकारल्याने हतबल झालेल्या पतीने अखेरीस पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफन करण्याची वेळ आली.


आधी घरातून हाकललं, आता मृतदेहही नाकारला!

गोरखपूरचे रहिवासी भुआल गुप्ता आणि त्यांच्या पत्नी शोभा देवी यांना तीन मुलं आणि तीन मुलींसह एकूण सहा अपत्ये आहेत. मुलांची लग्नं झाली, त्यांना नातवंडं झाली, पण एका वर्षापूर्वी याच मुलांनी आई-वडिलांना 'तुम्ही आमच्यावर ओझं झाला आहात,' असं म्हणून घरातून अक्षरशः हाकलून दिलं. मुलांचं बोलणं मनाला लागल्याने शोभा देवी आणि भुआल गुप्ता यांनी घर सोडलं. त्यांनी तर टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि आत्महत्या करण्यासाठी राजघाट गाठलं. पण सुदैवाने एका व्यक्तीने त्यांना रोखलं. नंतर अनेक ठिकाणी भटकल्यानंतर हे वृद्ध जोडपं जौनपूर येथील विकास समिती वृद्धाश्रमात आश्रयाला आलं.

वृद्धाश्रमात मृत्यू; मुलाला फोन करताच धक्कादायक उत्तर
जौनपूर वृद्धाश्रमाचे प्रमुख रवी कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा देवी यांना काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, १९ नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना किडनीचे आजारही होते.

पत्नीच्या निधनानंतर भुआल गुप्ता पूर्णपणे कोलमडून गेले. त्यांनी पत्नीच्या अंतिम इच्छेनुसार गोरखपुरमध्ये अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. वृद्धाश्रम प्रशासनाने लगेच त्यांच्या लहान मुलाला फोन करून आईच्या निधनाची बातमी दिली. परंतु, लहान मुलाने 'मोठ्या भावाच्या घरी मुलाचं लग्न आहे, त्यांच्याशी बोलून सांगतो,' असं म्हणून फोन ठेवून दिला.
'बॉडी फ्रीजरमध्ये ठेवा, अपशकुन होईल...'

थोड्या वेळाने लहान मुलाने पुन्हा फोन केला आणि मोठे भाऊ काय म्हणाले हे सांगितले, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. 'आईचा मृतदेह चार दिवसांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. आता घरी लग्न आहे. घरात मृतदेह आला तर अपशकुन होईल. लग्न झाल्यावर आम्ही येऊन अंत्यसंस्कार करू,' असं मोठ्या मुलाने अत्यंत बेजबाबदारपणे सांगितलं.

मुलांचं हे क्रूर बोलणं ऐकून भुआल गुप्ता यांचा संताप अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात पत्नीच्या मृतदेहावर जौनपूरमध्येच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचवेळी त्यांच्या मुलींनी फोन करून वडिलांना विनंती केली की, 'आईचा मृतदेह गोरखपुरला घेऊन या, आम्ही अंत्यसंस्कार करू.'

अखेरीस वडिलांनीच पत्नीवर केले अंत्यसंस्कार!
मुलींच्या शब्दाला मान देऊन भुआल गुप्ता हे पत्नीचं पार्थिव घेऊन गोरखपूरला पोहोचले. पण, तिथेही मुलाने आपल्या दारातून मृतदेह घरात घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. अखेरीस गावकरी आणि काही नातेवाईकांच्या हस्तक्षेपानंतर भुआल गुप्ता यांनी कॅम्पियरगंज येथील घाट परिसरात पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी देह मातीत दफन केला. माझी पत्नी माझ्यासमोर मातीत दफन झाली, मी तिचा विधिवत अंत्यसंस्कारही करू शकलो नाही, अशी खंत भुआल गुप्ता यांनी व्यक्त केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.