Breaking News ! सांगलीत भरदिवसा पोलिसांसमोर गोळीबार करण्याचा प्रयत्न; कलगुटकी खून प्रकरणातील सूत्रधारांना शूट करणार तेवढ्यात...
मिरजेतील निखिल कलगुटगी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकीवर आज मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एक बंदुक आणि एक कोयता जप्त केला. दरम्यान अन्य तीन हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले. या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे.
मिरजेत निखिल कलगुटगी याच्या खुनातील मुख्य सूत्रधारांसह चौघांना पोलिसांनी पुण्यातील लोणावळ्यामध्ये मागच्या चार दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. यामध्ये सलीम गौस पठाण (वय ३७, रा. मंगळवार पेठ, मिरज), चेतन सुरेश कलगुटगी (२८, रा. वडर गल्ली, मिरज), सोहेल जमीर तांबोळी (२६, नगारजी गल्ली, खणभाग रा. सांगली) आणि विशाल बाजीराव शिरोळे (२४, रा. होळी कट्टा मंगळवार पेठ, मिरज) यांचा समावेश आहे.
खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आज आणण्यात आलं होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले तिघे जण पळून गेले.
हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिवाल्वर आणि कोयता जप्त करण्यात आला. सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र सतर्क पोलिसांच्यामुळे या ठिकाणी अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून या परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
मिरजेतील गणेश तलाव येथे मागच्या दीड महिन्यांपूर्वी २८ सप्टेंबर २०२५ रोजी धारदार हत्यारांनी हल्ला करून निखिल कलगुटगीचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी दोन अल्पवयीन गुन्हेगारांसह ९ जणांना अटक केली. परंतु या खुनातील मुख्य सूत्रधार सलीम पठाण, चेतन कलगुटगीसह विशाल शिरोळे हा फरार होता. त्यांच्या मागावर मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणचे पथक होते.
खुनाला दीड महिना झाला तरी दोघे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांचे पथक तपास करीत होते. अखेर त्यांच्या पथकाला मुख्य सूत्रधार पुण्यातील लोणावळा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या दरम्यान पोलिस सलीम पठाणला वेद्यकिय तपासणीसाठी आणले असता त्याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे.सांगलीच्या गारपीर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहितेवर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून, शेखही ठार झाल्याचे वृत्त आहे.
मोहिते व शेख यांच्यातील जुन्या वादामुळे हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. तथापि, पूर्व वैमनस्य, सुपारी की इतर कारण या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सांगली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.