महाराष्ट्रात ऑपेरेशन Lotus! शिंदेंना जागा दाखवली जातेय, ३५ आमदार भाजपात जाणार, महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे वाटत आहेत. शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे असा हल्लाबोल अग्रलेखात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३५ आमदार भाजपात जाणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने बाजूला सारण्याची किंवा त्यांची जागा दाखवण्याची प्रक्रिया (लोटस कार्यक्रम) सुरू केली आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे. शिंदे यांनी बंडखोरी करून सत्ता मिळवली, परंतु आता त्यांच्याच पक्षातील लोक फोडले जात आहेत. 'जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी.' शिंदे गटाने भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी रक्कम देऊन त्यांची माणसे फोडल्याचा आरोप केला. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तक्रारीवर हसून या आरोपाकडे दुर्लक्ष केले, असे सामना अग्रलेखात म्हटले गेलेय.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील 'नाराजी'चे नाट्य अजूनही सुरू असून, आता त्याचा तिसरा अंक सुरू झाला आहे, जो लवकरच संपुष्टात येण्याची घंटा वाजत आहे. मजकूरानुसार, नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही, आणि हे 'नाराजी'चे महानाट्य कोसळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे.
शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा 'लोटस' कार्यक्रम सुरू झाला आहे. ''रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली'' या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद आहे. महाराष्ट्रात सत्तापक्षांतील 'नाराजी' नाट्य सुरूच राहील. या 'नाराजी' नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही. 'नाराजी'चे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
३५ आमदार फुटणार -
एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरचे ४० आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत, महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला. शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली. त्यामुळे आपणच शिवसेनाप्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले. आता भाजपने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळय़ांची दाणादाण उडाली आहे. शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जमत नाही. अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे. त्यात गणेश नाईक व रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या औकातीवर आणले. ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुनेजाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत. भाजपने आता स्वबळाचा नारा दिला व जेथे शिंदे यांचे आमदार निवडून आले, तेथे इतर पक्षांतील ताकदीची माणसे आपल्या पक्षात घेतली. म्हणजे पुढील विधानसभेला भाजप शिंदेंशिवाय निवडणुका लढणार हे नक्की. भाजपने एक 'पक्ष' निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपनेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान ३५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.