बिहार विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील महिलांसाठी हे विशेष योजना सुरू केली. मतदानाआधी लाखो महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले. मात्र, आता या योजनेत मोठा घोळ झाल्याचा दावा केला जात आहे. सरकारकडून आता पैसे परत मागितले जात असल्याचे सरकारी आदेश समोर आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर बिहारमध्येही मुख्यमंत्री महिला रोजगार योजना (जीविका दीदी) सुरू करत महिलांच्या खात्यात १० हजार पाठविण्यात आले. या योजनेमुळेच एनडीएने राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली. पण या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने त्याचे पुरावेच दिले आहेत. सरकारकडून जीविका दीदी म्हणजे महिलांच्या खात्यात पैसे पाठविण्याऐवजी पुरूषांच्या खात्यात पैसे पाठविल्याचे समोर आले आहे. आता ही चूक लक्षात आल्यानंतर आता संबंधित पुरूषांना प्रशासनाकडून पत्र पाठवून पैसे परत करण्याचे आदेश दिले जात आहेत. तेजस्वी यादव यांच्या पक्षाने हे आदेश सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.आरजेडीने म्हटले आहे की, बिहारमध्ये एनडीए नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांना लाच देऊन मतं विकत घेण्याची आणि सत्ता काबीज करण्याची घाई झाली होती. या घाईत त्यांनी मोठी गडबड केली. एवढे असुरक्षित वाटत होते की त्यांनी महिलांऐवजी पुरूषांच्या खात्यात १० हजार रुपये टाकले. आता पुरूषांना दहा हजार रुपये परत करण्यासाठी लव्ह लेटर पाठविले जात आहेत. बिहारमध्ये भूकबळी, महागाई, स्थलांतर आणि बेरोजगारी एवढी आहे की, दहा हजार जेव्हा बँकेत टाकले तेव्हाच खर्च झाले असतील. बिचारे पुरूष आता हे पैसे परत करणार नाहीत, कारण आधी त्यांचे मत परत करा, असे आरजेडीने म्हटले आहे.
दरम्यान, पुरूष खातेदारांच्या खात्यात पैसे गेल्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. हा आकडा बोटांवर मोजण्याइतपत असल्याचे सांगितले जात आहे. दिव्यांग जाविका समुहामध्ये महिला आणि पुरूष दोघेही आहेत. काही प्रकरणांमध्ये एकाच कॉलममध्ये बँक खात्यांची माहिती लिहिली आहे. त्यामुळे पात्र महिलांचे पैसेही पुरूष दिव्यांग सदस्यांच्या खात्यात पाठविले गेले. ही तांत्रिक चूक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. केवळ अशाच पुरूषांकडून पैसे परत घेतले जात असून एकाने ते परतही केले आहेत. हा आकडा जेमतेम १५ एवढाच असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.