भयमुक्त, नशामुक्त जनजागृती मोहिमेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद बापट मळा, सांगली येथे दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त सहभाग; दोन दिवसांत 1800 हून अधिक शस्त्र परवाना अर्ज
सांगलीमध्ये सुरू असलेल्या भयमुक्त व नशामुक्त जनजागृती मोहिमेला आज बापट मळा परिसरातही नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवत सुरक्षा व समाजव्यवस्थेबाबत जागरूकतेचा निर्धार व्यक्त केला.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खून, मारामाऱ्या, घरफोड्या, महिलांवरील अत्याचार, नशेच्या गोळ्या, ड्रग्स, गांजा, जुगार अड्डे यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फक्त ११ महिन्यांत ६१ खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. "जर नागरिकांना सुरक्षित वातावरण, सुरक्षा देणे शक्य नसेल तर स्व:रक्षणासाठी शस्त्र परवाने द्या" अशी अनोखी मागणी घेऊन या गंभीर पार्श्वभूमीवर सत्ताधारी राजकीय पक्ष व सामाजिक संस्था-संघटना यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या सोयी-सुविधांच्या अभावाविरोधात आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमांतर्गत स्वयं-सुरक्षा, गुन्हेगारीविरोधी जागरूकता, महिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, आणि युवकांना नशेपासून दूर ठेवण्याचे संदेश देण्यात येत आहेत. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रत्यक्ष भेटीद्वारे आवश्यक सूचना, प्रशासन विरोधी तक्रारी आणि अभियानास सहकार्य व्यक्त केले.
मोहिमेच्या प्रभावामुळे अवघ्या दोन दिवसांत 1800 पेक्षा जास्त नागरिकांनी स्वेच्छेने शस्त्र परवाना अर्ज भरले आहेत. वाढत्या असुरक्षित वातावरणात नागरिकांचा हा स्वयंप्रेरित सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, सोशल मीडिया, नागरिकांच्या बैठका आणि प्रत्यक्ष परिसर दौर्यांमुळे ही मोहीम मोठ्या प्रमाणावर जनआंदोलनाचे स्वरूप घेत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील लोक या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, ही मोहीम आता केवळ आंदोलन नसून सांगलीला पुन्हा सुरक्षित, भयमुक्त आणि नशामुक्त करण्याची सामूहिक जनचळवळ बनत आहे.
त्याचबरोबर, संपूर्ण सांगली जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता आणि नशामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी अशी जनजागृती मोहीम सातत्याने चालू राहणे अत्यावश्यक आहे. या विधायक उपक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष मा. तानाजीराव सावंत, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, भारत संचार निगम लिमिटेडचे समिती सदस्य मा. युसूफ उर्फ लालू मेस्त्री, जेष्ठ पत्रकार मा. कुलदीप देवकुळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. महेश खराडे, मा. नगरसेवक मयूर पाटील, मा. आशिष कोरी, शहर अध्यक्ष मा. सुरेश टेंगले, मा. रोहित घुबडे, मा. अमित पाटील, मा. प्रशांत जमगई, मा. स्वप्नील शिंदे, मुन्ना भाई पटेकरी, मा. संग्राम पाटणकर, मा. सुजित पवार, मा. राहुल बापट, मा.प्रशांत कांबळे यासह असंख्य निमंत्रक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.