Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणूक आयोगाचा शिंदेंना मोठा धक्का! निवडणुकीच्या 2 दिवस आधीच 'तो' निर्णय फिरवला

निवडणूक आयोगाचा शिंदेंना मोठा धक्का! निवडणुकीच्या 2 दिवस आधीच 'तो' निर्णय फिरवला


अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. निवडणुका नव्याने घेण्याचे आदेश देत निवडणूक आयोगाने आपला निर्णय फिरवला आहे. विशेष म्हणजे निवडणुका पुढे ढकलण्याचं अगदीच वेगळं कारण निवडणूक आयोगाने दिलंय.

का घेण्यात आला हा निर्णय?

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने निवडणूक आयोगाने अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले असून या निवडणुका 20 डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तरी अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेत असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं म्हणणं जिल्हाधिकारी निवडणूक आयोगासमोर मांडणार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहावे लागणार लागणार आहे. दरम्यान, ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

दोघांमध्ये सुप्त संघर्ष अंबरनाथ नगरपरिषद 
निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणं अपेक्षित होतं. आता हे मतदान तीन आठवडे पुढे ढकलण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यातील स्थानिक पातळीवरील मतभेद उघड झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. या ठिकाणी भाजपासोबत एकत्र लढण्याची इच्छा असूनही शिंदेंच्या शिवसेनेला ते शक्य झाले नाही. परिणामी, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून दोन्ही पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी थेट स्पर्धा आहे. हे स्थानिक पातळीवरचे राजकारण असून राज्य पातळीवर युती असले तरी अंबरनाथमध्ये दोन्ही मित्रपक्षांमध्ये फाटाफूट झाली आहे. एकेमेकांचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक पळवणे, शहरातील विकास कामांवर दावा आणि स्थानिक राजकारणातील स्पर्धा ही येथील संघर्षाची प्रमुख कारणं आहेत.
कोणाचा कोणता उमेदवार?

अंबरनाथ नगरपरिषदेत 59 जागा आहेत. आजपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार नामांकनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 रोजी महायुतीतील फाटाफूट उघड झाली. शिवसेना (शिंदे) आणि भाजपा यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट मुकाबला आहे. ज्यात शिवसेनेकडून मनीषा वळेकर निवडणूक लढवत असून त्यांच्य विरुद्ध भाजपाच्या तेजश्री करंजुले उभ्या आहेत. हे दोन्ही पक्ष महायुतीचे भागीदार असले तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढत आहेत.

श्रीकांत शिंदेंचा वादळी प्रचार
श्रीकांत शिंदे यांनी एका दिवसात अर्धा डझन रॅली घेऊन प्रचार केला. त्यांनी विकास कामांवर भर देताना नेहरू पार्क, गावदेवी मैदान, कम्युनिटी गार्डनचे अपग्रेड, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिव मंदिर सुशोभीकरण, नवीन थिएटर, मेडिकल कॉलेज (पहिले वर्ष पूर्ण), लायब्ररी आणि युपीएससी-एमपीएससी स्टडी सेंटर्स, शूटिंग रेंज, मोठे हॉस्पिटल ('नो कॅश काउंटर' मॉडेल), चिखलोली धरण, काळू आणि पोशीर नद्यांवर प्रस्ताव; मेट्रो आणि रस्ते जोडणी यासारख्या गोष्टींचा आपल्या भाषणात उल्लेख केला. "शिवसेना आणि भाजपासोबत महायुती अंतर्गत लढण्याची इच्छा होती, पण काही कारणाने ते शक्य झाले नाही. आता विकासावर जनादेश मागतो," असं श्रीकांत शिंदे भाषणात म्हणाले. आता निवडणूक पुढे ढकलली गेल्याने श्रीकांत शिंदेंचा हा प्रचार निष्फळ ठरला आहे. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा असाच दौरा करावा लागणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच हा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांच्यासाठी धक्का मानला जातोय.
मैत्रीपूर्ण लढत

भाजपाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ज्यामुळेच युती तुटल्याचं सांगितलं जातंय. राज्य पातळीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र असले तरी ठाणे जिल्ह्यात (कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ) स्थानिक निवडणुकांसाठी मैत्रीपूर्ण किंवा थेट लढत आहे. भाजपाने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अंबरनाथसारख्या भागात या मतदारांचा प्रभाव आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.