रत्नागिरी : युरोपातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय प्रदूषणाचे कारण बनलेला इटलीच्या त्रिसिनो शहरातील एक रासायनिक कारखाना हद्दपार करण्यात आला आहे. मिटेनी एस.पी.ए. ही कंपनीचा कारखाना जो पीएफएएस रसायने तयार करते.
जे माती, पाणी आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. या रसायनामुळे इटलीतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असून सुमारे साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यासारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मात्र आता हीच रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
इटलीच्या प्रादेशिक पर्यावरण संस्था ARPAV (Agenzia Regionale per la Protezione Ambientale Veneto) ने 2013 मध्ये त्रिसिनो आणि आसपासच्या परिसरातून पाण्याचे नमुने चाचणीसाठी गोळा केले. अहवालात भूजलात PFAS चे प्रमाण शिफारस केलेल्या मानकांपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे आढळले होते. तपासणीत असेही दिसून आले की, पीएफएएस विसेन्झा प्रांतातील अंदाजे 3,50,000 लोकांमध्ये पसरले होते. याप्रकरणी इटलीतील प्रदूषण नियंत्रण संस्थांनी चौकशी केली. परंतु चौकशीनंतरही मिटेनी कंपनीने पीएफएएस उत्पादन थांबवले नाही. त्यावेळी, कंपनी जपानच्या मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि अनेक इटालियन औद्योगिक गटांच्या संयुक्त मालकीची होती. प्रदूषणाचे पुरावे समोर येत असताना देखील कारखान्यातील काम थांबले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण संस्थांनी याचा विरोध केला, परंतु कायदेशीर प्रक्रिया लांबली. त्यामुळे प्रदूषण पसरत राहिले आणि परिसरातील पाणी विषारी बनत गेले.जून 2025 मध्ये, इटलीतील विसेंझा न्यायालयाने या प्रदूषण प्रकरणात अकरा माजी मिटेनी अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आणि त्यांना एकूण 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ज्यामध्ये एका अधिकाऱ्याने 17 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगली आहे. तसेच कंपनीला 58 ते 75 दशलक्ष युरोचा दंडही ठोठावण्यात आला होता. केमट्रस्टच्या अहवालानुसार, हा युरोपमधील पहिला गुन्हेगारी पीएफएएस प्रदूषण खटला होता, ज्यामध्ये कंपनीतील अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, मिटेनी कंपनीने 2018 मध्ये दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर 2019 मध्ये, मिटेनी कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या व्हिवा लाइफसायन्सेसने यावेळी बोली जिंकली. द गार्डियन आणि द जर्नलिझम फंडच्या मते, यंत्रसामग्री, फ्लोरिनेशन तंत्रज्ञान, पेटंट आणि युरोपियन रीच नोंदणी खरेदी करण्यात आल्या. मात्र व्यवहाराची रक्कम सार्वजनिक करण्यात आली नाही.त्यानंतर कंपनीचा संपूर्ण सेटअप समुद्रमार्गे भारतात पाठवण्यात आला. 2023 आणि 2024 मध्ये ही मशीन्स भारतात आली आणि मुंबई बंदरात उतरवली गेली. महाराष्ट्रातील लोटे परशुराम एमआयडीसी येथे एक नवीन इलेक्ट्रो-फ्लोरिनेशन युनिट बसवण्यात आले. जर्नलिझम फंडच्या अहवालानुसार, 2025 च्या सुरुवातीला उत्पादन सुरू झाले. गुंतवणूकदारांच्या सादरीकरणाच्या कागदपत्रांमध्ये विशेष रसायनांचा उल्लेख आहे, परंतु पीएफएएस हा शब्द स्पष्टपणे नमूद केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला आहे. असे असले तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेली जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.