Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज


दुबई : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून जगभरातील लोक थक्क झाले आहेत. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'च्या उत्तुंग टोकावर एक अत्यंत तीव्र वीज कडाडत कोसळली. या नैसर्गिक घटनेचा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की, पाहणार्‍याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये!

काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसते की, काळ्या ढगांनी झाकलेले आकाश अचानक एका तीव्र प्रकाशाने उजळून निघते. पुढच्याच क्षणी, आकाशातून थेट बुर्ज खलिफाच्या सर्वात वरच्या टोकावर (स्टील स्ट्रक्चर) वीज येऊन धडकते. यावेळी होणारा ढगांचा कडकडाट आणि पावसाचा आवाज या द़ृश्याला अधिकच थरारक बनवतो. जणू निसर्ग आणि मानवी अभियांत्रिकी एकमेकांसमोर उभे आहेत, असा भास हा व्हिडीओ पाहताना होतो. शेख हमदान यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताच तो काही वेळातच व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

अनेकांनी याला 'एखाद्या चित्रपटातील द़ृश्यासारखे' म्हटले आहे, तर काहींनी याला 'आजवरचे सर्वात भीतीदायक पण सुंदर द़ृश्य' असे संबोधले आहे. शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हे केवळ दुबईचे क्राऊन प्रिन्सच नाहीत, तर ते संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री देखील आहेत. सोशल मीडियावर ते अत्यंत लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर त्यांना 17 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर ते 'फज्जा' या नावाने प्रसिद्ध आहेत. ते आपल्या सोशल मीडियावरून निसर्ग, साहस, प्रवास आणि दुबईच्या विकासाशी संबंधित गोष्टी चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.