पुणे: मुंढवा येथील शासकीय मालकीच्या सुमारे ४० एकर जमिनीचे बंद झालेल्या सातबारा उताऱ्याचा वापर करून दस्तनोंदणी केल्याच्या गैरप्रकारानंतर असे प्रकार रोखण्यासाठी नोंदणी विभाग आणि भूमिअभिलेख पुढे सरसावले आहेत. ज्या भागातील सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही दोन्ही भू अभिलेख सुरू आहेत, अथवा सातबारा उतारा आहे; परंतु प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले नाही किंवा दोन्ही आहे.
परंतु सातबारा उताऱ्यावरील नोंद प्रॉपर्टी कार्डवर घेतलेली नाही, अशा मिळकतींचा शोध घेऊन त्यांचे फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या गोष्टींचा फायदा घेऊन नागरिक आणि बँकाची होणारी फसवणूक टळण्यास मदत होणार आहे.राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सुरू आहेत; अथवा सिटी सर्व्हे झाले असूनही सातबारा उतारा सुरू आहे.
अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने यापूर्वीच घेतला आहे. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे.महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी भूमिअभिलेख विभागाकडून सर्व मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. मात्र, त्या जागेचे सातबारा उतारे बंद करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोयीनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमिअभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार पुणे शहरातील सातबारा उतारा बंद करण्यात आले; परंतु काही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले नाही.
त्यामुळे अशा मिळकतदारांना व्यवहार करताना अडचणी येत आहेत. काही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असूनही सातबारा उतारा देखील सुरू राहिला आहे. काही प्रकरणांमध्ये सातबारा उताऱ्यावर नावे प्रॉपर्टी कार्ड घेण्यात आलेली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांची एकत्रित पडताळणी करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये शहरात बिनशेती झालेल्या सर्व जमिनींचे सातबारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्डच यापुढे ठेवण्यात येणार आहे, असे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.