बांगलादेश संघर्षादरम्यान मोठी बातमी : राजकारणातील युगाचा अंत! माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन
बांगलादेश सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय स्थित्यंतरातून जात असतानाच, देशाच्या माजी पंतप्रधान आणि 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या अध्यक्षा खालिदा झिया यांचे निधन झाले आहे.
वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी ढाका येथील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर काही महिन्यांतच झिया यांचे निधन झाल्याने बांगलादेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रदीर्घ आजारपण आणि प्रस्थापित सत्तेशी दोन हात करणाऱ्या एका धगधगत्या राजकीय पर्वाचा आज शेवट झाला आहे.
आजारपण आणि अखेरचा क्षण
खालिदा झिया गेल्या अनेक वर्षांपासून यकृत, किडनीचे विकार, फुफ्फुसाचा संसर्ग आणि मधुमेहाने त्रस्त होत्या. शेख हसीना यांच्या पाडावानंतर ६ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर त्या उपचारांसाठी लंडनला गेल्या होत्या आणि नुकत्याच मायदेशी परतल्या होत्या. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना ढाका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
दोन वेळा भूषवले पंतप्रधानपद
खालिदा झिया यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.
खालिदा झिया १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ अशा दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या.
माजी राष्ट्राध्यक्ष जिया-उर-रहमान यांच्या हत्येनंतर (१९८१) त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विखुरलेल्या BNP पक्षाला सावरले.
१९९१ मध्ये त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या.
'बॅटल ऑफ बेगम्स': शेख हसीनांशी संघर्ष
खालिदा झिया आणि शेख हसीना यांच्यातील राजकीय शत्रुत्व जागतिक स्तरावर 'बॅटल ऑफ बेगम्स' म्हणून ओळखले जाते. ८० च्या दशकात लष्करी राजवटीविरुद्ध या दोन्ही नेत्यांनी एकत्र लढा दिला, पण १९९१ मध्ये लोकशाही परतल्यानंतर त्या एकमेकींच्या कट्टर शत्रू बनल्या. गेली तीन दशके बांगलादेशची सत्ता या दोन महिलांच्या संघर्षाभोवतीच फिरत राहिली.
लष्करी बंडापासून सत्तेच्या शिखरापर्यंत
१९४५ मध्ये जन्मलेल्या खालिदा झिया यांचा राजकारणाशी सुरुवातीला कोणताही संबंध नव्हता. एका गृहिणीपासून ते देशाच्या अत्यंत शक्तिशाली नेत्या बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला, पण त्यांच्या समर्थकांमधील त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.