मुंबई लोकलमध्ये महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे पोलिसांचा प्रयत्न असतो. तरीही काही माथेफिरूंमुळे महिलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पनवेल-सीएसएमटीच्या ट्रेनमधील महिलांच्या डब्यात एका माथेफिरू पुरूषाने धिंगाना घातल्याचा प्रकार घडला आहे. डब्यातील उपस्थित महिला प्रवाशांनी या पुरूषाला खाली उतरण्यास सांगितल्यानंतर त्याने एका महाविद्यालयीन तरूणीला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलले. यानंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाखाली आरोपीला अटक केली.
टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पनवेल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक विजय तायडे यांनी टीओआयशी बोलताना सांगितले की, अटक केलेल्या आरोपीचे नाव शेख अख्तर नवाज असे आहे. गुरूवारी पीडित तरूणी मैत्रिणीबरोबर खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी पनवेलहून निघाली. पनवेल स्थानकावर सकाळी ७.५९ वाजता दोघी पनवेल – सीएसएमटी ट्रेनमधील महिला डब्यात चढल्या.
यावेळी आरोपी शेख अख्तर नवाजही महिला डब्यात चढला. महिला प्रवाशांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. शेखने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर महिलांनी त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर शेखने हिंसक होत डोअरजवळ उभ्या असलेल्या महाविद्यालयीन तरूणीला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलले. यानंतर महिला प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमाकांवर फोन करून सदर प्रकाराची माहिती दिली. जीआरपी पोलीसांनी खांदेश्वार स्थानकावर आरोपीला ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक तायडे यांनी टीओआयला सांगितले की, पीडित तरूणी पनवेल स्थानकापासून सुमारे १.५ किमी अंतरावर रुळावर पडली होती. जीआरपी पथक रुळावरून चालत घटनास्थळी पोहोचले. परंतु सदर तरूणी तिथे आढळून आली नाही. स्थानिक रहिवाशांकडे चौकशी केली असता त्यांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले. सुदैवाने तरूणीला मोठी दुखापत झालेली नाही. डॉक्टरांनी सीटी स्कॅन आणि एक्स-रे सारख्या चाचण्या करून अंतर्गत दुखापत झाली आहे का, याचीही तपासणी केली. त्यानंतर तरूणीच्या पालकांनी तिला घरी नेले.
पोलीस निरीक्षक तायडे म्हणाले की, आरोपी नवाजविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनातिकीट प्रवास, नियमांचे उल्लंघन असे रेल्वेचे दंडात्मक कलमही त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. तसेच आरोपी नवाज अस्वस्थ दिसत असल्यामुळे त्यालाही जेजे रुग्णालयात दाखल करून त्याची तपासणी करण्यात आली. तिथे डॉक्टरांनी त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले. पनवेल शहर न्यायालयात त्याला सादर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.