जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी बसवराज तेली यांची बदली करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस उप महानिरीक्षक पदावरून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात अपर पोलिस आयुक्तपदी त्यांची बदली झाली आहे. यापूर्वी तेली यांनी पिंपरी-चिंचवडमध्येच पोलिस उपायुक्त पदावर काम केले होते. आता पोलिस उपायुक्त हे पद उन्नत केले आहे.
याशिवाय गणेश इंगळे व प्रदीप जाधव यांची पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. गणेश इंगळे हे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे येथे पोलिस उपायुक्त, तर प्रदीप इंगळे हे गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती येथे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच सत्यजित आदमने यांचीही सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्या पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे पोलिस अधीक्षकपदी कार्यरत होते.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सध्याच्या सहायक पोलिस आयुक्त विभागाची पुनर्रचना करून हिंजवडी व महाळुंगे एमआयडीसी विभाग नव्याने निर्माण करण्यात आले आहेत. याशिवाय चाकण, आळंदी व महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यांचे विभाजन करून चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे या दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली आहे. या नवीन ठाण्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षकही मिळाले आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहे.
संतोष देशमुख हत्या तपासाचे काय?
गतवर्षी संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. या हत्येने प्रशासनाविरोधात संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने हा तपास सीआयडीकडे सोपवला होता. तसेच बसवराज तेली यांची मुख्य तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. तेली यांनी रेकॉर्डब्रेक वेळेत तपास करून कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपींना गजाआड केले. तसेच चार्जशीट फाईन करून न्यायालयात सुनावणीही सुरु झाली. सध्या सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशात तेली यांची बदली झाल्याने या तपासाचे पुढे काय? असा सवाल विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.