Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : रुग्णावर शस्त्रक्रिया नाकारली, महात्मा फुले योजनेतून मिरजेतील खासगी रुग्णालय निलंबित

सांगली : रुग्णावर शस्त्रक्रिया नाकारली, महात्मा फुले योजनेतून मिरजेतील खासगी रुग्णालय निलंबित


सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मिरजेतील एका खासगी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाला निलंबित करण्यात आले आहे. अन्य एका रुग्णालयात रुग्णांच्या तक्रारी आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ही दोन्ही रुग्णालये सांगली-मिरज रस्त्यावर असून तेथे हृदयविकारावरील उपचारांसह अन्य आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. यातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाने रुग्णावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्याचे नाकारले. महात्मा फुले योजनेतून उपचारांसाठी हा रुग्ण पात्र असतानाही रुग्णालयाने शस्त्रक्रिया केली नाही. त्यामुळे रुग्णाने योजनेकडे रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या छाननीनंतर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. रुग्णालयाने दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत शासनाने रुग्णालयाला योजनेतून अनिश्चित कालावधीसाठी निलंबित केले. 

अन्य एका प्रकरणात याच परिसरातील एका खासगी रुग्णालयाविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद झाली आहे. योजनेतून रुग्णांवर उपचार करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याने निदर्शनास आले. योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णाला बाहेरून औषधे आणायला लावणे, अनामत रक्कम जमा करण्याची सक्ती करणे असे तक्रारींचे स्वरूप होते. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रुग्णालयाकडून नोटिशीवर उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.


थकीत बिले मिळाली
दरम्यान, जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णालयांत महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार व शस्त्रक्रिया होतात. यातील बहुतांश रुग्णालये सांगली, मिरजेत आहेत. या सर्व रुग्णालयांची कोट्यवधी रुपयांची बिले गेल्या तीन महिन्यांपासून थकीत होती. त्यापैकी दोन महिन्यांच्या बिलांची रक्कम सोमवारी जमा झाली. उर्वरित एका महिन्याची रक्कमही लवकरच जमा होईल, असे योजनेच्या व्यवस्थापनाने सांगितले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांना पूर्णत: मोफत सेवा मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर पात्र रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय उपचारांपासून वंचित ठेवता येणार नाही. या नियमांचा भंग केल्याने दोन खासगी रुग्णालयांवर कारवाई केली आहे. रुग्णांनी तक्रारी केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते.

 - डाॅ. सुभाष नांगरे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले जनआरोग्य योजना
.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.