दारूचे दर वाढले अन् विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...
सोलापूर : राज्यात देशी-विदेशी दारूच्या किमतीत जुलैपासून वाढ झाली. दरवाढीनंतर विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलै ते नोव्हेंबर या काळात सव्वातीन लाख लिटरने विदेशी दारुची विक्री कमी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी यंदा ५२६ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट्ये असून डिसेंबरपर्यंत ३३४ कोटींचा महसूल मिळाला आहे. मार्चपर्यंत १९२ कोटींचा महसूल मिळविण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे.
जुलैपासून विदेशी दारुवरील कर (एक्साईज ड्यूटी) ३५० टक्क्यांवरून आता ७५० टक्के करण्यात आला आहे. देशी दारुवरील कर २२० टक्क्यांवरून २३५ टक्के झाला. महाराष्ट्रनिर्मित दारूवर २७० टक्केच टॅक्स असल्याने विदेशी दारूच्या तुलनेत महाराष्ट्रनिर्मित मद्यविक्री वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या काळात ५६ लाख लिटर विदेशी दारू विक्री झाली, पण यंदा याच काळात विक्री सव्वातीन लाख लिटरने घटली आहे.
दुसरीकडे बिअरची विक्री एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत सहा लाख लिटरने वाढली आहे. तसेच देशी दारुची विक्री देखील सव्वादोन लाख लिटरने वाढलेली आहे. केवळ, विदेशी दारूच्या विक्रीत घट झाल्याने महसुलाचे १०० टक्क्यांचे टार्गेट अपूर्ण असल्याची सद्य:स्थिती आहे. मद्यपींनी विदेशी दारूला बगल देत देशी दारू, बिअरला पसंती दिल्याचे दिसते. देशी-विदेशी दारूच्या दरवाढीमुळे जिल्ह्यातील गावागावांमध्ये हातभट्ट्या पेटल्याचे चित्र आहे.
सोलापुरात विदेशी दारुतील घट अशी...
महिना २०२४-२५ २०२५-२६जुलै ९,१७,७१६ ८,५०,०१८ऑगस्ट ८,१३,१८४ ५,७४,००१सप्टेंबर ८,११,६०७ ६,०७,५७६ऑक्टोबर ८,६०,७८४ ७,११,२४७नोव्हेंबर ८,६२,१८१ ७,१०,१९१एकूण ४२,६५,४७२ ३४,५३,०३३
मद्यविक्री दुकानांच्या हिशेबाची तपासणी
मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये हिशेब लिहिण्यासाठी एक-दोन कर्मचारी असतात. ते आठवड्यातून एक-दोन दिवस येऊन हिशेब लिहितात. त्यावेळी ते मागील काही दिवसातील विक्री अंदाजे लिहितात. या पार्श्वभूमीवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकांकडून दुकानांमध्ये आलेला मद्यसाठा व प्रत्यक्षातील विक्री, याची पडताळणी केली जात आहे. देशी-विदेशी दारू, बिअर शॉपींसह अन्य मद्यविक्री दुकानांचा हिशेब आता तपासला जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.