लग्न सोहळ्यासाठी निघाले, वाटेत नियतीनं घात केला, कारसह विहिरीत आढळले दोघांचे मृतदेह; 'त्या' एका गोष्टीमुळे पाटील दाम्पत्याचा अंत
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजीजवळ झालेल्या अपघातामध्ये तेलंगणा राज्यातील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पद्मसिंह दामू पाटील व त्यांची पत्नी नम्रता पाटील असं या दाम्पत्याचं नाव आहे. अचानक त्यांचं लोकेशन आणि मोबाईल नॉट रिचेबल झाल्यानं नातेवाईकांमध्ये खळबळ माजली होती. शोधाशोध सुरू झाल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांची कार आणि दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला. मात्र, आता या घटनेत एक नवीन गोष्ट समोर आली आहे.
जुनी कार ठरली जीवघेणी...
पद्मसिंह पाटील यांनी अलीकडेच नवीन कार घेतली होती. जुनी कार जळगावला नेण्यासाठी तेलंगणा ते खान्देशमधील जळगाव जिल्ह्यापर्यंत असा 800 किलोमीटरचा प्रवास त्यांनी स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. एरवी ते विमानाने प्रवास करत असत. मात्र, यावेळी कारने जाण्याचं ठरवलं पण नियतीने घात केला आणि हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील पारोळामधील वाघुळखेडा येथील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सुरत जिल्ह्यात सिमेंट कंपनीत गेल्या पाच वर्षापासून नोकरीला होते. पत्नी आणि मुलीसह ते तेथेच राहत होते. त्यांच्या परिवारात विवाह सोहळा असल्याने पद्मसिंह पाटील हे पत्नीसह आपल्या कारने गुरुवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तेलंगणातील त्यांच्या गावावरून पाचोरासाठी निघाले होते.
'आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत जळगाव येथे पोहोचू'
सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या चुलत भावासोबत संवाद झाला असता 'आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत जळगाव येथे पोहोचू', असं त्यांनी सांगितलं होतं. रात्री उशिरापर्यंत ते न आल्यानं कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या व पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोघांची फोन लागले नाहीत.
कारचा असा होता प्रवास...
या दाम्पत्याने आपल्या कारने पातूर मेडशी टोलनाका 5 वाजून 40 मिनिटांनी क्रॉस केला होता.त्यानंतर बाळापूर जवळील तरोडा येथील टोल नाक्यापासून 6 वाजून 31 मिनिटांनी कार पुढे गेली. वडनेर भोलजीजवळ 7 वाजून 14 मिनिटांनी त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन दाखवलं होतं, त्यानंतर मोबाईल बंद झाला. दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा सरळ अपघात नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी केला आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच ही घटना घडल्याचा दावा करत त्यांनी संबंधित यंत्रणेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.