जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 147 बालकांना मोफत 2डी इको शिबीराचा लाभ
सांगली जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ् कार्यक्रमांतर्गत शुक्रवार दि. 23 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या प्रयत्नाने 0 ते 18 वर्षे वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता डीईआयसी इमारत सिव्हिल हॉस्पिटल आवार, सांगली येथे मोफत 2डी इको शिबीराचे आयोजन करणेत आले होते. जिल्हयांतील 147 हृदयरोग संशयित वालकांची सदर शिवीरांतर्गत मोफत तपासणी करणेत आली. शिवीरांती 29 शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरुन अनुदान उपलब्ध करुन तसेच वैद्य शासकिय योजनेतून पूर्णपणे मोफत करणेत येणार आहेत. संदर्भित करणेत आलेल्या सर्व हृदयशस्त्रक्रिया या अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया प्रकाराच्या असून अत्यंत खर्चिक अशा आहेत. सदरकरिता 147 लाभार्थ्यांच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च हा रु. 2 लक्ष व प्रती शस्त्रक्रिया अंदाजित रु 6 लक्ष प्रमाणे रु. 1 कोटी 75 लक्ष इतक्या खर्चाच्या असून सदर करिताचे अनुदान हे धर्मादाय संस्था, खाजगी रक्कम दाते, रोटरी क्लब मुंबई इत्यादी ठिकाणाहून उपलब्ध करुन शस्त्रक्रिया मोफत करणेत येणार आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ् कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1950 लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया व 28500 लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करणेत आल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतील अधिकारी व कर्मचारी हे गाव, वाडी, वस्ती, तळ इथपर्यंत पोचून उन वारा पाऊस यांची तमा न बाळगता लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करत आहेत. तळागाळांतील गरजू लाभार्थ्यांना संदर्भित लाभार्थ्यांना विविध शासकिय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. सदर कामकाजाकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे देखील राष्ट्रीय बाल स्वास्थ् कार्यक्रमातील तपासणी पथकांच्या कामकाजाकरिता मार्गदर्शन लाभत आहे.सर्व लाभार्थ्यांच्या वेळेवर तपासणीकरुन या कार्यक्रमाचा लाभ करुन घेणेबाबत व सर्व शस्त्रक्रिया पूर्ण मोफत होणेकरिता आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आवाहन या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. मागील शिबीरामधील यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेवून कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हाधिकारी काकडे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच मागील काळामध्ये शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या गरजू बालकांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करणेबाबत पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचेमार्फत प्रयन्त करणार असल्याचे जाहीर केले.वरील लाभार्थ्यांची इको तपासणी ही बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांचेकडिल बालहृदयरोगतज्ञ डॉ. जयश्री मिश्रा यांनी केल्या, तसेच रुग्णालयाकडिल प्रतिक मिश्रा यांनी सदर शिबीराकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य केले. याप्रसंगी डीईआयसी अंतर्गत कार्यरत वर्षा चव्हाण, शितल कुंभार, इंदू पाटील, जीवन कांबळे, रोहित चौगुले यांचे सन्मानचिन्ह देवून सत्कार करणेत आला. निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया पाटील यांनी कार्यक्रमांच्या प्रगतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. कार्यक्रम प्रसंगी डॉ. अजय भोसेकर, उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ हे देखील उपस्थित होते. जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.