काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी आणि राजेश राठोड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यासह सत्ताधारी पक्षातील 6 आमदारांना महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. हे सर्व आमदार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आणि प्रतोद आहेत.
विधानसभा आणि विधानपरिषदेत प्रत्येक पक्षाचा एक मुख्य प्रतोद आणि एक प्रतोद असतो. 2017 मध्ये तत्कालिन सरकारने विधानसभा आणि विधानपरिषदेत एकूण संख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असणाऱ्या पक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट आणि प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांना इतरही सोयी-सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 14 वी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर 2021 मध्ये याबाबतचा नवा जीआर काढण्यात आला होता.
विद्यमान 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा जीआर काढण्यात आला आहे. यानुसार विधानसभा आणि विधानपरिषदेत एकूण संख्येच्या 10 टक्के सदस्यसंख्या असणाऱ्या पक्षाच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट आणि प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या एकूण 16 आमदारांना मंत्रिपदाचा असा दर्जा देण्यात आला आहे.भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद प्रसाद लाड, शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रमेश बोरणारे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोद मनीषा कायंदे, राष्ट्रवादीचे विधानसभेतील मुख्य प्रतोद चेतन तुपे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोदांना, काँग्रेसचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद अभिजीत वंजारी, प्रतोद राजेश राठोड, शिवसेना उबाठाचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद अनिल परब, प्रतोद सुनिल शिंदे यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.
विधिमंडळ सचिवालयाकडून मुख्य प्रतोदांना 25 हजार, तर प्रतोदांना 20 हजार रुपये प्रतिमाह मानधन, मुंबईतील अधिवेशनासाठी अनुक्रमे 25 हजार आणि 20 हजार वाहन भत्ता, तसेच नागपूर अधिवेशनात विभागीय आयुक्तालयाकडून वाहन व्यवस्था दिली जाणार आहे. याशिवाय अधिवेशन कालावधीत विधानभवनात कार्यालय, दूरध्वनी सेवा, एक स्वीय सहायक, एक लिपीक-टंकलेखक, एक शिपाई असा सुविधा उपलब्ध करून दिला जातात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.