Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रेकिंगसाठी गेलेले 50 विद्यार्थी, डोंगरदऱ्यात किंकाळ्या अन्. सह्याद्रीच्या कुशीत थरकाप उडवणारी घटना, फोटो समोर

ट्रेकिंगसाठी गेलेले 50 विद्यार्थी, डोंगरदऱ्यात किंकाळ्या अन्. सह्याद्रीच्या कुशीत थरकाप उडवणारी घटना, फोटो समोर


पुणे जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मढेघाट परिसरात रविवारी संध्याकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या ५० विद्यार्थ्यांच्या पथकावर मधमाशांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ३५ हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे प्रशिक्षक जखमी झाले आहेत. मात्र, दुर्गम भागात स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुण्यातील एका खासगी साहसी पर्यटन संस्थेमार्फत ५० विद्यार्थ्यांचा हा ट्रेक आयोजित करण्यात आला होता. यामध्ये १४ ते १७ वयोगटातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. मढेघाट ते उपंडा असा या ट्रेकचा मार्ग होता. घाट उतरून मध्यभागी असलेल्या गर्द झाडीच्या परिसरातून विद्यार्थी जात असताना, अचानक झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशा उठल्या. काही कळण्याच्या आतच हजारो मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. 
मधमाशांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थी डोंगरदऱ्यात सैरभैर धावू लागले. डोंगरकडा आणि घसरणीचा रस्ता असल्याने पळताना अनेक विद्यार्थी जखमी झाले. मधमाशांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि हातापायांवर अनेक दंश केले. १० हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर मधमाशांचे असंख्य दंश पाहायला मिळत आहेत. तर २५ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रेक प्रमुखांनी तातडीने तोरण माची हॉटेलचे मालक अभिजित भेके यांच्याशी संपर्क साधला. भेके यांनी ही माहिती तातडीने स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर टाकली. ही माहिती मिळताच केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि स्थानिक तरुणांनी कोणतीही वाट न पाहता कड्याच्या दिशेने धाव घेतली.

स्थानिक तरुणांनी कड्यामध्ये आणि झाडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिका पोहचेपर्यंत ग्रामस्थांनी स्वतःच्या खासगी वाहनांतून जखमी विद्यार्थ्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या पथकाने युद्धपातळीवर उपचार सुरू केले.
या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळणे आणि सतत उलट्या होणे, चेहरा, ओठ आणि डोळ्यांवर भीषण सूज येणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे, दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना आणि दाह होणे असा त्रास होत होता. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक त्रास होत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.