Big Breaking! आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांच्यावर बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा आरोप
राज्य शासनाकडून अहवाल मागवला : निवृत्तीच्या उंबरठ्यावर वादाचे सावट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याभोवती वादाचे सावट घोंघावत आहे. बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर करत शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचा आरोप थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने या प्रकरणी महाराष्ट्र शासनाकडून अहवाल मागवला आहे. मात्र, निवृत्ती झाली की प्रकरण संपले का, असा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
डॉ. चंदनवाले यांनी ५२ टक्के अपंगत्व असल्याचे दाखवून दिव्यांग कोट्यातून वैद्यकीय शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात वरिष्ठ पदे मिळवल्याचा आरोप आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या समितीच्या तपासणीत त्यांचे अपंगत्व १८ टक्के असल्याचे निष्पन्न झाले. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमानुसार आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किमान ४० टक्के अपंगत्व आवश्यक असताना १८ टक्के अपंगत्व असलेल्या अधिकाऱ्याने दिव्यांग कोट्याचे फायदे उपभोगले असतील तर हा प्रकार चुकून झालेला नसून तो थेट फसवणुकीच्या श्रेणीत बसतो. या प्रकरणाची तक्रार डॉ. दिव्यांश द्विवेदी यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडे नोंदवली आहे. त्याची दखल घेत केंद्राने राज्य शासनाला अॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानेही या तक्रारीवर बैठक घेतली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.