Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार; अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार; अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ


वणी (नाशिक) : महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव महेंद्र जाधव, गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन व गृह विभागाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्याचे तसेच अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील संकेत मंत्री झिरवाळ म्हणाले की, राज्यात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार सुरू असल्याने अधिक कठोर कायदेशीर तरतुदींची आवश्यकता आहे. गुटखा विक्रेत्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव यापूर्वी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता; मात्र 'हार्म' व 'हर्ट' या घटकांच्या अभावामुळे तो लागू होत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून गुटखा व्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणण्यासाठी कायदा अधिक कठोर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.
गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विविध जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे. गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर मकोका लागू करण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतुदी सुचविण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने गृह विभाग व विधी व न्याय विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.

विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर तातडीने आणि कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.