एकनाथ शिंदेंचा 'रिपोर्ट कार्ड' तयार; नापास मंत्र्यांना देणार डच्चू? महापालिका निकालांनंतर शिवसेनेत 'सर्जिकल स्ट्राईक'
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे. मात्र, या निकालांनी सत्ताधारी शिवसेनेत (शिंदे गट) मोठ्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज आहेत. “जिल्हा राखा, अन्यथा खुर्ची खाली करा!” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला हा कडक इशारा आता वास्तवात येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर ज्या मंत्र्यांनी आपल्याच जिल्ह्यात पक्षाची ‘नौका’ बुडवली, त्या मंत्र्याची खुर्ची आता उपमुख्यमंत्री खाली करण्याच्या तयारीत आहेत.
निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्येक ‘मंत्र्याला’ एक जिल्हा वाटून दिला होता. ठाणे आणि कोल्हापूरसारख्या काही अपवादात्मक जागा सोडल्या, तर उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेची कामगिरी सुमार राहिली. स्वतः सत्तेत असूनही आणि यंत्रणा हाताशी असूनही अनेक मंत्र्यांना पक्षाला ‘नंबर वन’ बनवता आले नाही. ही बाब शिंदेंच्या जिव्हारी लागली असून, मंत्र्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.उपमुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक मंत्र्यांची कार्यक्षमता मोजण्याची परीक्षा मानली जात होती. अनेक दिग्गज नेते या परीक्षेत नापास झाले आहेत. पुढच्या काही महिन्यांत निवडणूक (विधानसभा) आहे. जर आताच योग्य निर्णय घेतले नाही तर भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते, हे शिंदे ओळखून आहेत. मंत्र्यांचा आपल्याच मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क हे पराभवाचे मुख्य कारण ठरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अकार्यक्षम मंत्र्यांचे पद काढून त्यांच्या जागी नव्या दमाच्या, आक्रमक आणि जनसंपर्क असलेल्या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते. ज्यांचे मंत्रिपद जाईल, त्यांना केवळ ‘पक्ष संघटक’ म्हणून ठेवले जाण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.