मुंबई महापालिकेचा महापौर उद्धव ठाकरेंचा? त्या 'सुप्रीम' निकालाने पारडे फिरणार? ॲड.असीम सरोदेंच्या त्या ट्विटची देशभर चर्चा
मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याचा खल संपलेला नाही. बीएमसीचा महापौर हा शिंदेसेनेचा असावा की भाजपचा यावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे सेनेने तर त्यांचे नगरसेवक थेट ताज लँड हॉटेलमध्ये ठेवले आहेत.
तिथून ते कोकण भवनात जातील. फोडाफोडीची शक्यता लक्षात घेत हा प्रकार सुरु असल्याचा दावा करण्यात येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. तर इकडं एका ट्विटने अजून खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरेंचाच होईल असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत केला आहे. त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्या सुप्रीम निकालाने खरंच पारडं फिरणार?
भाजपचा मुंबईसह राज्यात झंझावात
भाजपचा मुंबईसह राज्यात झंझावात दिसून आला. अनेक महापालिकेत भाजप अगदी बहुमताच्या जवळ आहे. मुंबईत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदेसेनेची नितांत गरज आहे. या ठिकाणी शिंदेसेना ही महायुतीत किंगमेकर ठरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भाजपने महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडावं अशी आग्रही मागणी शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे. तर भाजपला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच महापौर करण्याची मोठी संधी आहे. त्यातून पेच निर्माण झालेला आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या खिशात 89 जागा तर शिंदे सेनेचे 29 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 114 हा मॅजिक फिगर आवश्यक आहे. पण मुख्यमंत्री राज्यात परतल्याशिवाय यावर अधिक भाष्य करणे दोन्ही पक्ष टाळत आहेत. या दोघांची महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरेंचा महापौर होणार?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदेंच्या एका ट्विटची सध्या देशात चर्चा सुरू आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जो तर्क दिला आहे, त्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. या ट्विटनुसार, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे.पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहचणे कठीण आहे, असे ट्विट ॲड.असीम सरोदे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचा होऊ शकतो.
मुंबई महापालिकेत राजकारण फिरणार
या ट्विटमध्ये ॲड.असीम सरोदे यांनी मुंबईतील महापौर घडामोडींवर मोठे भाष्य केले आहे. 'आता लोकांचा नवीन प्रश्न - जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल.शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील.सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल.' असा दावा सरोदे यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.