विटा :- ऐन निवडणूकीत सांगलीच्या विटा येथे माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर भानामतीचे साहित्य टाकणाऱ्या एका बंगाली भोंदू बाबाला आणि एका स्थानिकाला नागरिकांनी शोधून बेदम चोप दिला आहे. भोंदू बाबासह स्थानिक व्यक्तीची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. माजी आमदार सदाशिव पाटील आणि वैभव पाटील यांच्या घरासमोर दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या बंगाली भोंदू बाबासह स्थानिक व्यक्ती मेटकरी याच्याकडून काळी जादूसाठी वापरणारे साहित्य टाकण्यात आले.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी भानामतीचा प्रकार करणाऱ्या बंगाली बाबूसह स्थानिक व्यक्तीला शोधून बेदम चोप दिला. त्याची शहरातून धिंड काढत विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी आमदाराच्या घरासमोर करण्यात आलेल्या काळ्या जादूच्या प्रकारामुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे.संबंधित प्रकार समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नागरीक प्रचंड आक्रमक झाले होते. हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. विटा पोलिसांकडून दोन्ही आरोपींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी समोर आलेली अशीच एक घटना
निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे जादूटोण्याच्या घटना समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील वारंवार अशा जादूटोण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच सांगली जिल्ह्यातील अशीच एक घटना समोर आली होती. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुत्यातील येलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे वडील दिवंगत ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर आता सांगलीच्या विटा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.