कल्याण : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकशाहीच्या उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली.
मात्र, कल्याण पूर्व विभागातील एका केंद्रावर निवडणूक ड्युटीसाठी देण्यात आलेल्या तुटपुंज्या भत्त्यावरून संताप व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने केवळ ५०० रुपये भत्ता देण्याच्या शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हे मानधन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
नेमकी घटना काय?
कल्याण पूर्व येथील नेतिवली भागातील कल्याण डोंबिवली म.न.पा. शाळा क्र. १९ मधील मतदान केंद्र क्रमांक ९८/३३ (तळ मजला, खोली क्र. १) येथील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनाची एक पावती समोर आली आहे. या तक्त्यानुसार, मतदान केंद्रावरील इतर निवडणूक अधिकाऱ्यांना १५५० ते २००० रुपयांपर्यंत भत्ता देण्यात आला. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या विलास दादाराव मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावासमोर केवळ ५०० रुपये रक्कम लिहिण्यात आली होती.
स्वाक्षरीऐवजी नोंदवला 'लेखी' निषेध
इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांना मिळणारा भत्ता अत्यंत कमी असल्याचे पाहून विलास मुंडे यांनी भत्त्याच्या रक्कमेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यांनी पावतीवर अधिकृतपणे "देय मान्य नाही, शासन परत" असे लिहून आपला विरोध नोंदवला आहे. दिवसभर उन्हात उभे राहून आणि संवेदनशील केंद्रावर ड्युटी करूनही मिळणारे हे तुटपुंजे मानधन म्हणजे पोलिसांच्या कष्टाची थट्टा असल्याची भावना पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.
पोलिसांमध्ये नाराजीचा सूर
निवडणूक प्रक्रियेत पोलीस कर्मचारी मतदानापूर्वी दोन दिवस आणि मतदानानंतर पेटी जमा होईपर्यंत ड्युटीवर असतात. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही तितकाच किंवा त्याहून अधिक वेळ कामावर राहावे लागते. असे असताना मानधनामध्ये एवढी मोठी तफावत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विलास मुंडे यांनी घेतलेल्या या धाडसी भूमिकेचे सोशल मीडियावर स्वागत होत असून, गृह विभागाने पोलिसांच्या निवडणूक भत्त्याबाबत पुर्नविचार करावा, अशी मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.