शरद पवारांनी विमान घातपाताची शक्यता फेटाळली, पण विजय वडेट्टीवारांची मोठी मागणी; तर वैमानिकाला विमान लँड करण्याचा संदेश कोणी दिला? संजय राऊतांची विचारणा
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर 80-90 टक्के लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही. त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. सीआयडी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही.
सीआयडीपेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने खुलासा करताना हा निव्वळ अपघात असल्याचे म्हटले होते. तसेच काही गोष्टी आपल्या हातात नसल्याचे नमूद केले होते. दुसरीकडे, भाजपकडून अजित पवारांच्या निधनानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व दैनिकांमधून जाहिरात देण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टिप्पणी केली होती. अजित पवारांबद्दल खरंच प्रेम असेल, तर त्यांनी 70 हजार कोटींचे आरोप मागे घ्यावेत, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. या वक्तव्यावर अजूनही ठाम असल्याचे संजय राऊत म्हणाले.
आरोप विनाअट मागे घ्यावेत
संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने अपघात झाला, त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे, एटीसी (ATC) नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती, मग अशा अपघाताला जबाबदार कोण? एवढे मोठे नेते आणि व्हीआयपी (VIP) तिथे उतरतात, तरीही तिथे पुरेशी यंत्रणा आणि स्टाफ का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्हिजिबिलिटी नसतानाही वैमानिकाला विमान लँड करण्याचा संदेश कोणी दिला, याची चौकशी झाली पाहिजे. भाजपने आणि प्रधानमंत्र्यांनी अजित दादांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल, तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले ते आरोप तुम्ही मागे घ्या, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जर ते निर्दोष होते म्हणूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतले असेल, तर ते आरोप खोटे होते हे मान्य करून आता ते विनाअट मागे घ्यावेत, असे राऊत म्हणाले.
अमानुष आणि माणुसकी शून्य लक्षण
दुसरीकडे संजय राऊत म्हणाले की, अजित दादांना कालच अग्नी दिलेला आहे. अजित दादांच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही आणि तरी जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. अशावेळी राजकीय चर्चा करणे किंवा नेतृत्वावरून पत्ते खेळणे हे अमानुष आणि माणुसकी शून्य लक्षण असल्याची टीका त्यांनी केली. पवार कुटुंबातील प्रत्येक घटक सध्या शोकाकुल आहे, त्यामुळे किमान 15-20 दिवस या विषयावर भाष्य करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि अजित पवारांवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीनी एकत्र यावं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मते जुळावीत. आता दादा तर नाहीत, अशा परिस्थितीत पक्षाची ताकद एकवटावी. राजेश टोपे यांचं म्हणणं जर असं असेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, तर हे आम्हालाही माहित होतं. अजित दादांनीच त्या संदर्भात पुढाकार घेतला होता.
तर निश्चितच आम्हालाही आनंद
सुनेत्रा ताई जर उपमुख्यमंत्री होत असतील आणि पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळत असेल, तर त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे असल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांना विरोधी पक्ष नको आहे आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी कोणालाही त्यात आडवा येऊ देऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. उपमुख्यमंत्री पद हे कुठले संविधानिक पद नाही, त्याला काहीच आधार नाही. मग विरोधी पक्षनेता 10 टक्के आमदार नाहीत म्हणून त्यावर संशोधन किंवा नवीन बिल आणण्याची गरज काय? अशी विचारणा त्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.