सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीतभाजपला ३९ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ३९ त्यामुळं दोलाईमान परिस्थिती निमार्ण झालेली असताना, भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारी पक्षाशी बोलणी सुरू असून काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेत पुढाकार घेईल असे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १८ सदस्य निवडून आले असून महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. तर भाजपचे ३९ सदस्य विजयी झाले आहेत. भाजपला बहुमतासाठी एका मताची गरज आहे. तथापि, यानंतर स्थायी समितीमध्ये बहुमत राखण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने भाजपपुढे सत्ता स्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत निरंकुश सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आणखी मित्रांची गरज भासत आहे तर भाजप विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेली अन्य सर्व पक्षांची सदस्य संख्याही ३९ आहे.या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्यांनी वांगी (ता. कडेगाव) येथे जाउन स्व. पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार डॉ. कदमही उपस्थित होते. सांगली महापालिकेत काँग्रेस दोन नंबरचा आज पक्ष बनला असून सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसच्या समविचारी पक्षांसोबत आम्हीही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेस हा पक्ष सोडून ज्या पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेस आहे ते सर्व आमच्या संपर्कात आहेत, सत्ता स्थापनेबाबत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे.काही नेत्यांनी कालच याबाबत संपर्क साधला होता. तसेच खासदार विशाल पाटील यांनीही याबाबत भेट घेउन चर्चा केली आहे. ज्या समविचारी पक्षांचे नगरसेवक निवडून आलेत ते आमच्या संपर्कात आहेत, त्या पक्षाकडून आमच्याकडे काही प्रस्ताव आलेले आहेत, या प्रस्तावाबत बसून चर्चा करण्यात येईल. सांगलीत ५५ जागाच्या वर आम्ही जिंकू असं म्हणणाऱ्या भाजपला बहुमत गाठता आले नाही हाच त्यांना मोठा धक्का असल्याची टीका कदम यांनी भाजपवर केली. दरम्यान शिवसेनेचे आमदार सुहार बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असे सांगितले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी राष्ट्रवादीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.