Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापलेल्या नवऱ्याने धाडधाड गोळ्या झाडल्या, बायकोसह चौघांचा जागीच मृत्यू, नेमकं कारण काय ?

संतापलेल्या नवऱ्याने धाडधाड गोळ्या झाडल्या, बायकोसह चौघांचा जागीच मृत्यू, नेमकं कारण काय ?


अमेरिकेत राहणार्‍या भारतीय दाम्पत्यांचे कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात नवऱ्याने घरातील बंदुकीने धाडधाड गोळ्या झाडल्या. यामध्ये भारतीय महिलेसह ४ जणांचा मृत्यू झाला. मुलांनी कपाटात लपून आपला जीव वाचवला. एका मुलाने हिम्मत करून पोलिसांना फोनवर या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. तिन्ही मुलांना आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांकडे सोपवण्यात आले आहे. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये ही धक्कादायक घटना घडली.

आरोपीचे नाव विजय कुमार असे आहे. तर मृतांमध्ये ४३ वर्षीय मीनू डोगरा (विजय याची पत्नी) आणि त्यांच्या तीन नातेवाईकांचा समावेश आहे. गौरव कुमार (३३ वर्ष), निधी चंदर, (३७ वर्ष) आणि हरीश चंदर, (३८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मीनू आणि विजय यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शुक्रवारी या वादान हिंसक वळण घेतले. विजय याने रागाच्या भरात बंदूक आणली आणि धाडधाड गोळ्या झाडल्या.

बापाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिन्ही मुले धाडसाने कपाटात लपून बसली होती. त्यामधील एका १२ वर्षाच्या मुलाने धाडसाने ९११ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. फोन आल्यानंतर काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुलांना कुटुंबातील इतर सदस्यांकडे सोडण्यात आले. पोलिसांनी ५१ वर्षीय आरोपी विजय कुमार याला जंगलातून अटक केली आहे. विजय हा अटलांटा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खून, गंभीर हल्ला आणि मुलांवर क्रूरतेचे अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. 

या हल्ल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि मीनू यांच्यामध्ये अटलांटामध्ये जोरात वाद झाला होता. हे दाम्पत्य इतर पीडित राहत असलेल्या जॉर्जियामधील लॉरेन्सव्हिल येथील घरी आले होते. त्या ठिकाणीही पुन्हा दोघांचे भांडण झाले. या भांडणाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अटलांटातील भारतीय दूतावासाने या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.