मिरजेमध्ये अजित पवार यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तडीपार उमेदवार आझम काझी समर्थकांनी दादांना साकडे घालत काझी यांच्यावर केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधले. यावेळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये अजित पवार गटाच्या उमेदवारावर कारवाई करण्यात आली आहे.
मिरजेतील शोएब काझी, कुपवाडमधील सूरज शेख, विटा हद्दीतील राजाराम बोडरे आणि आटपाडी हद्दीतील जितेंद्र काळे टोळी अशा चार टोळ्यांना हद्दपार करण्यात आले. निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. मिरज शहर हद्दीतील टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहंमद युसूफ साहेबपीर चमनमलिक काझी (वय ३४, रा. टाकळी रस्ता) सदस्य मतीन ऊर्फ साहेबपीर चमनमलिक काझी (३२, रा. टाकळी रस्ता), अक्रम महंमद काझी (४२, रा. काझीवाडा, मिरज), आझम महंमद काझी (३९, रा. गुरुवार पेठ, मिरज), अल्ताफ कादर रोहिले (३६, रा. ख्वॉजा वस्ती, मिरज), मोहसीन कुंडीबा गोदड (२६, रा. टाकळी रस्ता, गोदड मळा, मिरज). या टोळीविरुद्ध २००६ ते २०२५ या कालावधीत बेकायदा जमाव जमवून गर्दी मारामारी, धार्मिक भावना दुखावणे, नुकसान करणे, गंभीर दुखापत, अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, चोरी, खंडणी, फसवणूक, अॅट्रॉसिटी, विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला करणे, सार्वजनिक उपद्रव, गृह अतिक्रमण, दरोडा अशी गुन्ह्यांची मालिका दाखल आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ नुसार मिरज पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता.
कुपवाडची टोळी
कुपवाड एमआयडीसी हद्दीतील टोळीप्रमुख सूरज ऊर्फ रमजान मौला शेख (४४), सदस्य शब्बीर मौला शेख (२७), सौरभ विलास जावीर (२०), अर्जुन ईश्वरा गेजगे (३५, सर्व रा. प्रकाशनगर, गल्ली नं. ६, कुपवाड) या टोळीविरुद्ध २०१८ ते २०२५ या कालावधीत कट रचून खून करणे, खुनाचा प्रयत्न, जमाव जमवून दुखापत करणे यासह अन्य गुन्हे दाखल आहेत.
या जिल्ह्यांतून हद्दपारी
मिरज व कुपवाडमधील टोळ्यांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. विट्यातील टोळीस सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी, तर आटपाडी हद्दीतील टोळीस सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.