देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, गेल्या 4 महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. या निवडणुकीत मराठी माणूस, मुस्लिम मतदार आणि उत्तर भारतीय मतदार अशा तीन वोट बँक चर्चेत आहेत. एकीकडे भाजप ठाकरेंचा महापौर झाला तर खान आडनावाचा असेल असा प्रचार करत आहे.
तर दुसरीकडे भाजपचा महापौर झाला तर तो अमराठी असेल असा प्रचार ठाकरे बंधूंनी सुरु केलाय. शिवाय, मुंबईतील विकास कामांवरुन देखील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. दरम्यान, आगामी 2026 मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच मराठी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे? याबाबतचा महत्त्वाचा सर्व्हे समोर आला आहे. देशातील नामांकित सर्वेक्षण संस्था असेंडिया यांनी केलेल्या या सर्व्हेमध्ये मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या मागे उभा असल्याचं चित्र आहे. मात्र, महायुती देखील मराठी माणसाचा विश्वास संपादन करण्यात मागे राहिलेली नाही. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरण्याची चिन्हं आहेत.
मराठी माणसाचा कल ठाकरे बंधूंच्या बाजूने, पण महायुतीने विश्वास मिळवला
"मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मतदान करणार आहात?" असेंडिया कंपनीने विचारलेल्या या प्रश्नावर मराठी मतदारांनी दिलेली उत्तरं राजकीय पक्षांसाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहेत. या सर्व्हेनुसार मराठी माणसांपैकी 44 टक्के मतदार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या संभाव्य युतीला मतदान करण्यास इच्छुक आहेत. ही टक्केवारी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना बळ देणारी आहे.
मुंबई महापालिकेत चुरशीची लढत होण्याची चिन्ह
दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महायुतीला 42 टक्के मराठी मतदारांचा पाठिंबा असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. म्हणजेच, ठाकरे बंधूंच्या युतीपेक्षा अवघ्या 2 टक्के मतांनी महायुती मागे आहे. त्यामुळे मराठी मतांचा सामना अत्यंत अटीतटीचा असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हा कल बदलू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या सर्व्हेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला केवळ 4 टक्के मराठी मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येतं. यावरून मुंबईतील मराठी राजकारणात काँग्रेसची पकड कमकुवत झाल्याचं स्पष्ट संकेत मिळतात. तर 'इतर' पर्यायांना 11 टक्के मराठी मतदार पसंती देत आहेत, जे निवडणुकीच्या गणितात 'फॅक्टर' ठरू शकतात.राजकीय तज्ज्ञांच्या मते, मराठी मतदारांमध्ये ठाकरे आडनावाची भावनिक पकड अजूनही मजबूत आहे. शिवसेनेची स्थापना, मराठी अस्मिता, मुंबईवरील हक्क आणि स्थानिक प्रश्न हे मुद्दे ठाकरे बंधूंच्या बाजूने जात असल्याचं चित्र आहे. मात्र, विकासकामं, केंद्र आणि राज्यातील सत्ता, तसेच संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर महायुती मराठी मतदारांना आकर्षित करत असल्याचंही सर्व्हे सूचित करतो.एकंदरीत, असेंडिया कंपनीच्या या सर्वात मोठ्या सर्व्हेनुसार मुंबईतील मराठी माणूस दोन स्पष्ट गटांत विभागलेला दिसतो. ठाकरे बंधूंची संभाव्य युती थोडीशी आघाडीवर असली, तरी महायुतीला दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत मराठी मतदारांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने लागतो? यावरच सत्तेचं गणित ठरणार आहे, हे नक्की.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.