कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न सी पी आर मधील खाजगी रक्ततपासणीसाठी रुग्ण पाठवल्याप्रकरणी २४ डॉक्टर दोषी:, सांगली- मिरजेत अशी कारवाई कधी होणार
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या पाच सदस्यीय समितीने कोल्हापूरच्या राज्य शासनाच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागातील २४ डॉक्टरांना दोषी ठरवले आहे. रुग्णालयाच्या आवारात २४ तास सुरू असलेली मध्यवर्ती प्रयोगशाळा असतानाही या डॉक्टरांनी रुग्णांचे रक्तनमुने खासगी प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवले.
या दोषी डॉक्टरांमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टरांकडून सुरू असलेल्या ‘कट प्रॅक्टिस’बाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. खासगी प्रयोगशाळांचे एजंट रुग्णालयाच्या ओपीडीबाहेर थांबून सेवा देत असल्याचा आरोप आहे. या प्रयोगशाळा तपासणीसाठी २ हजार ते ७ हजार रुपये आकारत होत्या. चौकशी समितीसमोर दिलेल्या लेखी उत्तरात डॉक्टरांनी सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत किंवा काही तपासणी किट उपलब्ध नसताना ते खासगी प्रयोगशाळांकडे रक्तनमुने पाठवतात.
मात्र प्रयोगशाळा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर समितीने स्पष्ट केले की, मध्यवर्ती प्रयोगशाळेत सर्व आवश्यक तपासण्या उपलब्ध असून ती २४ तास सुरू आहे. या समितीचा अहवाल पुढील कारवाईसाठी राज्य आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी सांगितले, “ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आणि अशा प्रकारात सहभागी होऊ नये, असा इशारा देण्यात आला. बहुतांश रक्ततपासण्या आमच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेतच होतात. रुग्णांना खासगी प्रयोगशाळांकडे पाठवण्याची काहीही गरज नाही. चौकशीचा निष्कर्ष आम्ही राज्य आरोग्य विभागाला कळवला आहे. पुढील कारवाईचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.”
समितीच्या अहवालानुसार २२ गर्भवती महिलांना खासगी प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले. यातील बहुतेक महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. त्यांना जवळपास मोफत प्रसूती सेवा, मोफत औषधे आणि कमी दरात तपासण्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. या डॉक्टरांनी गर्भवती महिलांना संपूर्ण रक्ततपासणी, एचआयव्ही चाचणी, यकृत तपासणी, मूत्रपिंड तपासणी, हिपॅटायटिस बी चाचणी आदी तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांकडे पाठवले होते. चौकशीत या सर्व तपासण्या रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळेतच उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. या गैरप्रकाराचा पर्दाफाश करणारे सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील म्हणाले, “या विभागात सुरू असलेल्या चुकीच्या पद्धती थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. इतर विभागांमध्येही अशाच प्रकारची चौकशी व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई व्हावी, अशीही आमची मागणी आहे.” सांगली- मिरजेतपण असे रक्त गटाचे सॅम्पल खुद्द शिकवू डॉक्टर सॅम्पल घेऊन संबधित खाजगी लॅब मध्ये पाठवतात. यांच्यावर कारवाई कधी होणार? अशी नागरिकात चर्चा होऊ लागली आहे. सांगली शासकीय रुग्णालया बाहेर बरेच खाजगी लॅब आहेत परंतू सॅम्पल ठराविकच लॅबला जाण्यास हे डॉक्टर सांगतात यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. यांच्यावर आदिष्टता लक्ष घालणार का?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.