"होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!
पुणे : "खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला "होय, मी बाजीरावच आहे' अशा शब्दात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. "नऊ वर्ष महापालिकेची तिजोरी त्यांच्याकडेच होती, ती त्यांनी खाली केली. त्यामध्ये एकही आणा ठेवला नाही, हे त्यांनीच मान्य केले बरे झाले. पहिले बाजीराव पेशवे हे कर्तबगार, पराक्रमी होते. त्यांनी मनगटाच्या जोरावर मराठी साम्राज्य वाढविले, आमच्याही मनगटात जोर आहे. आम्ही पुन्हा तिजोरीत आणे आणू आणि मोफत मेट्रो, बस प्रवास देऊ' असे हि पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची मंगळवारी सांगता झाली. तत्पूर्वी शिवाजीनगर येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोफत मेट्रो, बस प्रवासाच्या आश्वासनांची खिल्ली उडवली. त्यानंतर सायंकाळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना तेवढ्याच खेळीमेळीच्या वातावरणात उत्तर दिले. पवार म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनांबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मोफत मेट्रो, बस प्रवास घोषणा अशक्य असल्याचे किंवा बेजबाबदार वक्तव्य असल्याची टिका केली जात आहे. मी दुर्लक्ष केले असते, मात्र लोकप्रतिनिधी म्हणून, थेट जनतेशी बोलणे हि माझी जबाबदारी आहे. आम्ही दिलेली आश्वासने हे उपकार नाहीत किंवा दानधर्म नाही. हि निवडणुकीपुरती दिलेली आश्वासने नाहीत, तर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरे देशातील सर्वाधिक उत्पादनक्षम असणारी शहरे आहेत. ही शहरे मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करतात, कर भरतात. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही दोन्ही शहरे चालवतात. त्यामुळे येथील नागरिकांसाठी आम्ही केलेल्या योजना या त्यांच्या हक्काच्या व अधिकाराच्या आहेत, असे आम्हाला वाटते. आमचा जाहीरनामा पैसा उधळण्यासाठी नाही, लोकांनी भरलेला कर त्यांना योग्य स्वरूपात परत मिळावा, हा त्यामागील उद्देश आहे.' असे सांगून आपण दिलेल्या आश्वासनांवर "लाव रे तो व्हिडिओ म्हणत पवार यांनी पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्याची थेट चित्रफीत यावेळी दाखविली.
अजित पवार कोण ? हा प्रश्न स्वतःला विचारा
मोफत मेट्रो, बस प्रवासाच्या आश्वासनावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी अगोदर अजित पवार कोण ? हा प्रश्न स्वतःला विचारावा असे सांगून पवार म्हणाले, "मी राज्याचा अनेक वर्ष उपख्यमंत्री आहे. अर्थमंत्री म्हणून राज्याचा अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. सहकार चळवळ, बॅंकींग व्यवस्था, पायाभूत सुविधा, वित्त व मोठे प्रशासनाचा मला दीर्घ अनुभव आहे. आर्थिक नियोजन प्रत्येक रुपयाच्या पातळीवर कसे करावे, हे मला माहिती आहे. मोफत मेट्रो, बस प्रवासाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. तर सखोल विचार करून, तज्ज्ञांचा सल्ला, राजकीय धैर्य व जनतेबद्दलच्या काळजीतून घेतलेला आहे.' तुम्हाला रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला नको का ? तुम्हाला लवकर घरी पोहोचायचे नाही का ? चांगले रस्ते व ताणतणावमुक्त जीवन आपल्याला नको का ? यासाठी धाडसी व ठोस निर्णय घ्यावे लागतात, असेही पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले,
- जगातील यशस्वी शहरांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवडच्या समावेशासाठी प्रयत्नशील- आमची आश्वासने उपकार किंवा दानधर्म नाही, तर लोकांच्या करातील हक्क आहे- लोकांना त्यांनी भरलेला कर योग्य स्वरूपात मिळण्यासाठीच आमचे प्रयत्न- मैत्रीपूर्ण लढत कशी असू शकते, तुमच्या उणिवा दाखवाच्या नाहीत का ?- घड्याळ सोडून कुठलेही चिन्ह दिसले तरीही डोक्यात धोक्याचा अलार्म वाजू द्या
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.