जेवणाच्या बिलात १० रुपये सर्व्हिस चार्ज लावल्यानंतर ग्राहकानं शिकवला धडा; रेस्टॉरंटला बसला ५०,००० रुपयांचा दंड
मुंबईतील एका रेस्टॉरंट चालवणाऱ्या कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने मोठा झटका दिला आहे. जेवणाच्या बिलात सेवा शुल्क समाविष्ट केल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बोरा बोरा रेस्टॉरंट चालवणाऱ्या चायना गेट रेस्टॉरंट प्रा. लिमिटेडवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. एप्रिलमध्ये जेवणाची मूळ ऑर्डरची रक्कम आणि जीएसटी यासह १० टक्के सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला होता. याची तक्रार मुंबईतील एका रहिवाशाने प्राधिकरणाकडे केली होती.
मुंबईतील रहिवाशाने दावा केला की, जेव्हा त्यांनी शुल्क काढून टाकण्याची मागणी केली तेव्हा रेस्टॉरंटने यासाठी नकार दिला. तसेच त्यांना हे पैसे देण्यास भाग पाडले गेले. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) दिल्ली उच्च न्यायलयाने मार्च महिन्यात दिलेल्या एका निर्णयाचा हवाला देत म्हटले की, कोणत्याही अनिवार्य सेवांसाठी शुल्काची आकारणी करणे हे कायद्याशी विसंगत आहे. प्राधिकरणाने बिलाचे निरीक्षण केल्यानंतर तक्रारदार ग्राहकाचा युक्तिवाद खरा असल्याचे म्हटले. ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांना लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. बिलात कोणत्याही सेवा शुल्काची आकारणी कायद्याच्या विरुद्ध आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे घोषित करूनही रेस्टॉरंटने बिलात सेवा शुल्क आकारले होते, असे प्राधिकरणाने दिलेल्या आदेशात म्हटले आह.प्राधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले की, रेस्टॉरंटला संधी देऊनही ते सुनावणीसाठी हजर राहू शकले नाहीत. तसेच आवश्यक असलेली कागदपत्रेही त्यांनी पुरवली नाहीत. त्यानंतर रेस्टॉरंटने प्राधिकरणासमोर सादरीकरण केले आणि सेवा शुल्काची आकारणी तात्काळ बंद केल्याचे म्हटले. प्राधिकरणाने पुढे म्हटले की, सदर रेस्टॉरंट सॉफ्टवेअर आधारित बिल जनरेशन सिस्टम वापरत होते. ज्याद्वारे २८ मार्च २०२५ ते ३० एप्रिल २०२५ पर्यंत अनेक ग्राहकांकडून सेवा शुल्काची वसूली करण्यात आली. तसेच कंपनीच्या तीनही रेस्टॉरंटमधून मोठ्या प्रमाणात सेवा शुल्क वसूल केलेले असावे, असेही प्राधिकरणाने म्हटले. सॉफ्टवेअर जनरेटेड बिलिंग सिस्टममध्ये तात्काळ बदल करण्याचे आदेश रेस्टॉरंटला देण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.