कोल्हापूरच्या निवडणुकीत वादग्रस्त बनले सांगलीतील भाजप आमदार पुत्राचे नाव कंत्राट घेतले मात्र वेळेत काम करणे टाळल्याचा आरोप चर्चेत
सांगली: कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा थेट संबंध सांगली जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदार पुत्राशी जोडला गेला आहे. या पुत्राला या थेट पाईपलाईनचे कोल्हापूर शहरात जाळे विस्तारण्याचे कंत्राट मिळाले मात्र त्याने ते काम वेळेत पूर्ण न केल्यानेच कोल्हापुरचा पाणी प्रश्न कायम राहिल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला असून त्याची कुजबुज सांगली महापालिकाक्षेत्रात सुरू झाली आहे.
निवडणुकांच्या तोंडावर भ्रष्टाचाराचे आरोप, प्रत्यारोप होतच असतात. मात्र यावेळी शेजारच्या जिल्ह्यातील वादात सांगली जिल्ह्यातील आमदाराच्या पुत्राचे नाव आले आहे. विशेष म्हणजे हे आमदार पुत्र. कंत्राटदार देखिल आहेत अशी नवीनच माहिती पुढे आल्याने आपल्या जिल्ह्यातील नेते बाहेरच्या जिल्ह्यात कंत्राट घेण्याचे काम करत आहेत काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याप्रमाणे सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून काँग्रेस आघाडीच्या केंद्रातील सत्ता काळात थेट पाईप लाईनला कसा निधी मिळाला, मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात या कामाला कशी गती मिळाली याची सविस्तर माहिती देतानाच कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा होताना निर्माण झालेल्या अडचणी कोणामुळे झाल्या याचा गौप्यस्फोट केला.यामध्ये भाजपच्या सांगली जिल्हयातील आमदारांच्या पुत्राला हे कंत्राट दिले असा त्यांचा आरोप खळबळ उडवून देणारा आहे. येत्या सात दिवसात निवडणूक प्रचारात सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातही याची चर्चा जोर धरण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामाच्या मागे सांगली जिल्हयातील एखाद्या नेत्याच्या कंपनीला कारणीभूत ठरवणारी ही अलिकडच्या काळात राजकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे याबद्दलचे आरोप, प्रत्यारोप सांगली जिल्हयात देखिल जोर धरू शकतात. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली, मिरजेत या मुद्यावर जोर देऊन रान उठवण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी सतेज पाटील यांचीही सभा आयोजित करण्याची मागणी होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.