उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशातच पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अशातच आता पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पुण्यातील बड्या नेत्याचं निधन झालं आहे. पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे.
76 व्या वर्षी अखेरचा श्वास
शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
पुण्याचे महापौरपद भूषवलं
शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या कालावधीत पुण्याचे महापौर पद अत्यंत प्रभावीपणे भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. महापौर म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच प्राधान्य दिले. एक संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष
राजकीय प्रवासात सुरतवाला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जात असे. पक्षाच्या पडत्या काळात आणि संघटना बांधणीत त्यांनी पुण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पवार साहेबांच्या विचारांशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले, म्हणूनच पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक ठरले.
पुण्यातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी
दरम्यान, राजकारणाव्यतिरिक्त शांतीलाल सुरतवाला हे पुण्यातील एक प्रथितयश उद्योजक होते. पुण्यातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. व्यापार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना देखील करून दिला. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.