Big Breaking! निकालानंतर उद्धव-राज ठाकरें यांना सोबत घेणार? फडणवीसांच्या त्या दाव्याने एकच खळबळ, काय असेल राजकीय चित्र?
राज्यात विधानसभा निवडणुकीपासून भाजपप्रणित महायुतीचा झंझावात दिसून येत आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीत भाजपने कधी नव्हे ते तुफान आणलं आहे. आता राज्यातील महापालिकांचा गड कोण सर करणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड वगळता इतर ठिकाणी विरोधक आणि महायुतीचा सामना दिसत आहे.राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच बाजी मारणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी 26 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर निवडून येईल असे छातीठोकपणे सांगितले आहे. तर गरज पडल्यास निकालानंतर उद्धव-राज ठाकरे यांना सोबत घेणार का या प्रश्नावर असे खणखणीत उत्तर दिलं.
महाराष्ट्र मोदींजीच्या पाठीशी
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल.भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल. महायुतीचीच सत्ता महापालिकांमध्ये असेल. महाराष्ट्र कुणासोबत असेल हे अधोरेखित होईल. महाराष्ट्रातील अनेक शहरात मी प्रचारासाठी फिरलो. मला असा विश्वास वाटतो की लोक आमच्या बाजूने आहेत. आम्ही भाजीपाल्याचा ठेला चालवणाऱ्याला आणि डॉक्टर, वकील यांना सुद्धा तिकीट दिले आहे. आम्ही टॉक शो केले. सभा घेतल्या. कोपरा बैठका घेतला. यामध्ये आम्ही विकासाचा मुद्दा अजेंड्यावर ठेवला.
उद्धव-राज ठाकरेंना सोबत घेणार?
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 29 महापालिकांपैकी 26 ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल असा दावा केला. त्यात भाजप अधिक ठिकाणी दिसेल. तर इतर ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर असतील असा दावा केला. जर मुंबई महापालिकेत गरज पडली तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सोबत घेणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं. अशी बिलकूल गरज पडणार नाही. आम्ही बहुमताने महापालिकेत येऊ असा दावा त्यांनी केला. आता राजकीय युतीची कोणतीही शक्यता नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. दोघांशी वैयक्तिक संबंध चांगलेच राहतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठाकरें बंधूंवर टीका
मराठी-अमराठीचा मुद्दा पेटवण्याचा विरोधकांनी मोठा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी माणूस हा संकुचित नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या संस्कृतीचे, भाषेचे जतन आणि संरक्षण होईल. पण मराठी माणसाचा विकास म्हणजे काय, गेल्या 25 वर्षात मराठी माणसाला उपनगरात पलायन करावं लागलंय आणि यांनी केवळ वल्गना केल्या. परप्रांतिय अथवा उत्तर भारतीय रिक्षा चालकाला दोन चापटा मारणे हा काही विकास नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आम्ही 80,000 मराठी बांधवांना बीडीडी चाळीत हक्काचं घर बांधून दिलं. अभ्यूदय नगर, पत्रा चाळ, विशाल सह्याद्री, मोतीलाल नगर असेल, येथील मराठी माणसाला त्याच ठिकाणी घरं देण्यात आली. नाहीतर तो वसई-विरारच्याही पलिकडं राहायला गेला असता.मराठी माणूस हा विरोधकांसोबत नाही. अमराठी तर त्यांच्यासोबत नाहीच असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. के. अण्णामलाई यांनी चुकून बोलता बोलता बॉम्बे म्हटलं. याचा अर्थ ते मुंबईविरोधात आहे असे होत नाही. तर विरोधकांनी ज्या प्रकारे तामिळींवर टीका केली तो अपमान ठरत नाही का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.तर पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढतीत उत्साहाच्या भरात, निवडणुकीच्या ज्वरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून टीका झाली. पण आम्ही त्याला विकासाच्या मुद्यातून उत्तर दिले. आम्ही त्यांच्यावर उलट टीका करत बसलो नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत मोठी दरी आल्याच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचेच सूतोवाच फडणवीस यांनी केले. ANI या वृत्तसंस्थेला त्यांनी ही खास मुलाखत दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.