पोलिस मुख्यालय परिसरातूनच चक्क पोलीस अंमलदाराची दुचाकी दिवसाढवळ्या चोरून नेली; सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागातच चोरट्यांचा धुमाकूळ
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील पोलिस मुख्यालय परिसरातून एका पोलिस अंमलदारांची दुचाकी चोरट्याने लंपास केली. शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळीत ही चोरी झाली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. हा परिसरही आता चोरट्यांच्या नजरेतून सुटला या सारखी धक्कादायक घटना नाही.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी निलेश माळी हे पोलिस मुख्यालयात सुरक्षेचे काम करतात. त्याठिकाणी काम करणारे कार्मचारी परिसराच्या बाहेर रस्त्यावरच आपली दुचाकी पार्क करतात. माळी यांनी घटनेदिवशी शहीद अशोक कामटे चौकाच्या कापऱ्यात गाडी लावली होती, असे फिर्यादीत नमुद आहे. माळी यांनी त्याची दुचाकी लॉक करून ठेवली होती. भरदिवसा चोरट्यांनी त्या गाडीचे लॉक तोडून चोरी केली. याची कानोकान खबर पोलिसांना लागली नाही. यावरून पोलिसांच्या दक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होतोय. पोलिस मुख्यालय परिसरात अनेक अंमलदार सुरक्षेसाठी असतात. अशा परिस्थितीत चोरट्यांनी हे धाडस केले.दरम्यान, पोलिस मुख्यालय परिसरातून यापुर्वी चंदनाची झाडेही चोरी गेली होती. दोन वेळा घटना घडल्या होत्या. हा परिसर सुरक्षित नाही, तर सांगलीकर कसे सुरक्षित असतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. स्थानिक पोलिसांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेतली आहे. तातडीने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. अशी तत्परता इतरांच्या दुचाकी चोरीतही दाखवावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.