"जय जिनेंद्र. लक्षात ठेवा!" अजित पवारांचा मुरलीधर मोहोळांना थेट इशारा; जमीन घोटाळ्यावरून पुण्यात वादाचा भडका
पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून (आजराजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर जोरदार टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.
अजित पवार म्हणाले की, एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे म्हणून तिच्या पत्नीचा किंवा कुटुंबाचा काय दोष आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. मित्र पक्षांना कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा अधिकार असून आपण स्वतः गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही. मित्र पक्षांनी घड्याळ चिन्ह देण्याची विनंती केली होती आणि अनेक निवडणुकांमध्ये असे होत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी सूचक टिप्पणी करत बहुतेकांना आता कळले आहे की तो व्यवहार होऊच शकत नव्हता, असे म्हटले. या प्रकरणातील चौकशीचा संदर्भ देत "जय जिनेन्द्र" प्रकरणात काय झाले, हे सर्वांनाच माहिती आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असल्याचे चित्र आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमनेसामने आल्याने प्रचारातही धार वाढताना दिसत आहे. विविध मुद्द्यांवरून नेते एकमेकांवर टीका करत असून राजकीय संघर्ष तीव्र होत आहे.विकासकामांबाबत बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. विकासकामे करताना केवळ ये रे माझ्या मागल्या अशा पद्धतीने काम करू नका, तर दर्जेदार आणि पारदर्शक कामांवर भर द्या. चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका. अनेकदा हावशे, नवशे, गवशे आजूबाजूला जमतील आणि खरे काम करणारे बाजूला पडतील, याची जाणीव ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. विरोधकांचीही कामे करा, मात्र आधी आपल्या नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य द्या, असेही ते म्हणाले.
मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र एक व्यक्ती घायावळ असताना ती परदेशात पळून कशी गेली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मोहोळांवर पुन्हा टोला लगावला. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर बोलताना असा प्रश्नच उद्भवणार नाही. आम्ही महापौर करण्यासाठीच ही लढाई लढत आहोत आणि आमचाच महापौर होणार, असा ठाम दावा अजित पवार यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.