Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी. पक्षाची धुरा आता कोणाकडे?

अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी. पक्षाची धुरा आता कोणाकडे?


अजित अनंतराव पवार हे नाव राज्याच्या राजकारणात जवळपास चार दशकांहून अधिक काळ केंद्रस्थानी राहिले. सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून १९८२ मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. राज्यात विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. मात्र या उमद्या नेत्याच्या, विमान अपघातातील अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकीकरण, पक्षाचे नेतृत्व असे प्रश्न निर्माण झालेत. अर्थात आजच त्याची चर्चा योग्य नसली तरी, येत्या काळात हे मुद्दे महत्त्वाचे ठरतील.


कार्यकर्त्यांचा नेता
काम होत असेल तर हो सांगून, तडक कार्यकर्त्याचे काम जागेवर करणार, अन्यथा स्पष्टपणे नमूद करणार हा अजित पवार यांचा कामाचा खाक्या. पहाटे सहा वाजल्यापासून अधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी हे नित्याचे. अनेक वेळा सामान्य नागरिक राजकारण्यांना दूषणे देतो, मात्र या व्यक्ती किती तास काम करतात, समाजासाठी किती वेळ देतात याचा विचार करत नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद १९९१ मध्ये त्यांच्याकडे आले. पुढे सोळा वर्षे या पदावर ते होते. लोकसभेवर १९९१ मध्ये बारामती या पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून विजयी झाले. पुढच्याच वर्षी राज्य मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली. बारामतीमधून सात वेळा चढत्या मताधिक्याने ते विधानसभेवर गेले. सभोवती कार्यकर्त्यांची वर्दळ, बोलण्यात हजरजबाबीपणा यामुळे राज्याच्या राजकारणात विशेषत: ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता कायम राहिली. मोठे संघटन उभे करूनही मुख्यमंत्रीपद हुकल्याची हुरहूर त्यांच्या समर्थकांत आहे. अजितदादांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या समवेत राजकीय क्षेत्रात काम केले. मात्र २३ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी बंड करत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे अल्पकाळ टिकले. ते पुन्हा स्वगृही परतले. मात्र पुन्हा २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडत सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यांच्याबरोबर बहुसंख्य आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. 
फूट अन् विलीनीकरणाकडे…

अजित पवार भाजपबरोबर गेल्याने त्यांच्यावर टीका झाली. हा वैचारिक संघर्ष होता. मात्र सत्तेबरोबर राहिल्याने मतदार संघातील तसेच कार्यकर्त्यांची कामे होतात. अशी धारणा त्यांच्याबरोबर गेलेल्या अनेकांची होती. विचारांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन महत्त्वाचा हेच सूत्र यातून पुढे आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला. सुनिल तटकरे यांच्या रूपाने त्यांचा एकमेव खासदार विजयी झाला. दादांच्या पत्नी सुनेत्राताई बारामतीमधून लोकसभेला सुप्रिया पवार यांच्याविरोधात पराभूत झाल्या. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षात हा त्यांना धक्का होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांनी भरपाई करत राज्यात तिसऱ्या क्रमांकाच्या जागा निवडून आणल्या. भाजपशी संघर्ष करून लाभ नाही हे जाणून, समन्वयाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ठेवली. अर्थात वैचारिक तडजोड केली जाणार नाही हे देखील नमूद केले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा परिणाम झाला नाही. विधासभेला बारामतीमधून विक्रमी मताधिक्य घेत मतदारसंघावरील पकड सिद्ध केली. विधानसभेला शदर पवार गटाची कामगिरी खराब झाली. महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. विरोधाची धार कमी झाली. त्यातूनच पुढे नगरपालिकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अनेक ठिकाणी आघाडी झाली. यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. आता अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर विलीनीकरण आणि नेतृत्वाचा मुद्दा पुढे आला.

पुढे काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी अजित पवार राज्यातील जबाबदारी तर सुप्रिया सुळे या केंद्रातील राजकारण सांभाळत. अजित पवार यांनी सवतासुभा मांडल्यानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे राज्यातील राजकारणात अधिक सक्रिय झाले. मात्र त्यांचा अनुभव तुलनेत कमी आहे. आता अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकीय क्षेत्रात असंख्य प्रश्न निर्माण झाले. पक्षाचे नेतृत्व, सरकारमधील स्थान तसेच विलीनीकरण हे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. शरद पवार हे एप्रिलमध्ये राज्यसभेतील निवृत्तीनंतर पुन्हा सदस्य होतील ही शक्यता कमी आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत भाजपशी थेट युती टाळली आहे. ८० च्या दशकात राज्यातील त्यांचा समाजवादी काँग्रेस पुलोदमध्ये भाजप होता. मात्र भाजपविरोधी भूमिकेतून अनेक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते पवारांबरोबर असल्याचे सांगितले जाते. आता एकदम या भूमिकेत बदल होणार काय? तसेच केंद्रात सुप्रिया सुळे यांच्यावर काही जबाबदारी येणार का? राज्यात अजितदादांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढचे काही महिने महत्त्वाचे ठरतील. यात भाजपची भूमिका निर्णायक ठरेल. एका उमद्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राज्याच्या राजकारणात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.