बारामतीवर आभाळ फाटलं! कार्यकर्ते दादा... दादा... म्हणून घाय मोकलून रडू लागले...; बारामतीत प्रचंड गर्दी, विदारक दृष्ये...
बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. लाडक्या नेतृत्वाच्या चिंतेने बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्रावक आणि विदारक दृश्ये पाहायला मिळत आहेत.
'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया'च्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या नेत्यासाठी अनेकजण ढसाढसा रडताना दिसत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून बारामतीमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली आहेत. आजूबाजूच्या गावातून हजारो नागरिक आणि कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाला असून, "आमचे दादा आम्हाला परत द्या" अशा आर्त हाका मारताना कार्यकर्ते घाय मोकलून रडत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांची महत्त्वाची माहिती
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने अद्याप त्यांची अधिकृत ओळख पटू शकलेली नाही."आम्ही तांत्रिक तपासणी आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत," असे गिल यांनी स्पष्ट केले आहे. तणावपूर्ण शांतता: बारामतीमध्ये सध्या कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी, लोकांच्या मनातील भावना अनावर झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.