Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावध! HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस गाडी जप्त करणार की परवाना रद्द? पाहा नवे नियम..

सावध! HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस गाडी जप्त करणार की परवाना रद्द? पाहा नवे नियम..


जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. ही मुदत संपल्यानंतर आता आरटीओ किंवा पोलीस दंड आकारणार का, अशी भीती अनेक वाहनधारकांमध्ये होती. कारण यानंतर कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली नव्हती.

मात्र आता या वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. परिवहन विभागाने तूर्तास अशा वाहनांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्या गाड्यांना अजूनही नवीन नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात जुन्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी याआधी रोमजार्टा सेफ्टी सिस्टिम, रियल मेजॉन इंडिया आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स या तीन एजन्सी नेमण्यात आल्या होत्या. मात्र या कंत्राटदारांची मुदत आता संपली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली असून नव्या एजन्सीचा शोध घेतला जात आहे. जोपर्यंत नवीन कंत्राटदार काम सुरू करत नाही, तोपर्यंत एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत सरकारकडून चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

याआधी नियम असा होता की,
-ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली पण नंबर प्लेट बसवली नाही, त्यांना १००० रुपये दंड
-आणि ज्यांनी कोणतीही प्रक्रिया सुरूच केली नाही, त्यांना १० हजार रुपये दंड

मात्र आता प्रत्यक्षात कारवाई करायची की नाही, याबाबत संभ्रम असल्यामुळे ही कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे. ही सवलत किती काळासाठी आहे, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.

राज्यात सध्या सुमारे २ कोटी १० लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी ९७ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे, तर प्रत्यक्षात फक्त ७५ लाख वाहनांवरच नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. म्हणजे अजूनही कोट्यवधी वाहने नवीन नंबर प्लेटच्या प्रतीक्षेत आहेत.

एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर नेमकी काय कारवाई करायची, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र ज्यांनी आधीच ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांनी दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार संबंधित फिटमेंट सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन आयुक्तांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.