काही थेंब केमिकलचे अन् दूध तयार! पोलिसांकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त; झिरवळ अन् फडणवीसांचे खाते आमने-सामने?
मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाचा कारभार 'लाच' प्रकरणामुळे चर्चेत आहे. यातच अहिल्यानगर पोलिसांनी जामखेड इथं मोठ्याप्रमाणात दूध बनवणारे केमिकलचा साठा जप्त करत या विभागाच्या अहिल्यानगरमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जामखेड इथं कारवाई करत, तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवत, 17 लाख 32 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे. अहिल्यानगर पोलिसांनी ही कारवाई करत, मंत्री झिरवळ यांच्याकडील अन्न व औषध प्रशासनाच्या खात्याच्या अहिल्यानगरमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी जामखडे इथल्या फक्राबादच्या रामदास नवनाथ उबाळे याच्या दूध संकलन केंद्रावर केमिकलचा वापर करून, दूध बनवले जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगरमधील अधिकाऱ्यांना बोलावून घेत, दूध केंद्रावर छापा घातला. परंतु अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेवटपर्यंत छापा कोठे घातला जाणार आहे, याचा पुसटशी देखील कल्पना दिली नाही. अन् कारवाई यशस्वी केली.
दूध संकलन केंद्रावर छापा घालत, पोलिसांनी समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता.राहुरी), आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) आणि रामदास नवनाथ उबाळे (वय 46, रा. फक्राबाद, ता. जामखेड) या तिघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दूध संकलन केंद्राची तपासणी केली. त्यावेळी तिथं 6 ड्रममध्ये 1198 लिटर Paraffin नावाचे केमिकल, दूध पावडर आढळले. केमिकलचा वापर करत दूध तयार करणे, 6 ड्रममधील केमिकलपासून 24,000 लिटर दूध तयार होत असल्याचे आढळले. अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमिकलची तपासणी केल्यावर, ते केमिकलपासून मानवी शरीरास घातक, असे दूध तयार होत असल्याचे लक्षात आले.
दूध
तयार करण्यासाठी वापरले जाणारे 2 लाख 39 हजार 600 रुपयांचे 1198 लिटर
Paraffin Oil, 81 हजार 056 रुपयांचे प्लास्टिक बॅगमध्ये पांढऱ्या रंगाची
300 किलो पावडर, 12 हजार 160 रुपयांचे 320 लिटर केमिकलपासून तयार केलेले
दूध, 14 लाख रुपयांचो दोन पिकअप वाहनं, असा एकूण 17 लाख 32 हजार 816
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक
गुन्हे शाखा पोलिसांच्या या कारवाईनंतर जामखेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी
भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील
तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक
किरणकुमार कबाडी यांनी दिली.
मंत्री झिरवळ यांचे खाते अन् चर्चा...
दूध भेसळीची माहिती पोलिसांना मिळते. परंतु दूध, अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र खाते असून, त्यांना याची माहिती मिळत नाही, हे पोलिसांच्या कारवाईवरून समोर आलं आहे. अहिल्यानगरमधील अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत दूध भेसळीविरोधात केलेल्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे या खात्याचा कारभार आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्याने दूध भेसळीवर कारवाई केल्याने, अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.