मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील उद्यानात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाखांचा दोन किलो तयार गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
नवाज सलीम मकानदार (वय ३२, रा. प्रताप कॉलनी, रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विक्री, साठा, तस्करी यावर कारवाई करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत. एक तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील उद्यानात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.पथकाने उद्यानात सापळा रचला. तेथे मकानदार आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ दोन किलो तयार गांजा सापडला. त्याबाबत चौकशी केल्यावर तो गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याला अटक करून गांजा जप्त करण्यात आला.महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, अभिजीत धनगर, सचिन कुंभार, नानासाहेब चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, मोसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, निवास माने, देवानंद नागरगोजे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.