Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; जिल्ह्यातील पहिले तृतियपंथिय पंचायत समिती सदस्य

सांगली : नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; जिल्ह्यातील पहिले तृतियपंथिय पंचायत समिती सदस्य
 

सांगली : आटपाडी पंचायत समिती गठित होण्यापुर्वीच नूतन सदस्य आणि आवळाईचे उपसरपंच दिलीप हेगडे यांचे शुक्रवारी ह्दयविकाराने निधन झाले. जिल्ह्यातील ते पहिले तृतियपंथीय पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारत विठ्ठलापूर गणातून मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे ते तालुक्यातील तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले पंचायत समिती सदस्य ठरले होते. त्यांच्या निवडीने वंचित आणि उपेक्षित घटकांना नवे बळ मिळाले होते. समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्या धाडसी पावलाचे स्वागत करण्यात आले होते.

हेगडे यांनी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही प्रभावी कामगिरी बजावली होती. ते आवळाई ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. सरपंच पद रिक्त असल्याने सरपंचपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपवण्यात आली होती. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि विविध विकासकामांबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क आणि संवेदनशील संवाद ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जात होती.

तृतीयपंथी उमेदवार म्हणून मिळालेल्या उल्लेखनीय यशामुळे पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची संधी त्यांना मिळणार असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये रंगली होती. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेतल्याने त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हेगडे यांच्या निधनाने केवळ एक लोकप्रतिनिधी नव्हे, तर समाजासाठी झटणारा, समावेशकतेचा संदेश देणारा आणि परिवर्तनाची वाट चोखाळणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने आटपाडी तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना तालुक्यात व्यक्त होत आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनीही हेगडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.