Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?
 

राज्यसभेच्या ७ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. यात संख्याबळानुसार महायुतीला ६ तर महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर खलबतं सुरू झाली आहेत. भाजपने मंगळवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत १० ते १२ नावांवर चर्चा केली. यातून काही नावं निश्चित केली असून ती दिल्लीला पाठवण्यात आली आहेत.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. बैठकीत रामदास आठवले यांच्यासह १० ते १२ नेत्यांच्या नावावर या चर्चा झाली आहे. 
 
भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रितम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांची चर्चा होतेय. भाजपने याशिवाय आणखी काही नावांवर चर्चा केली असून कोअर कमिटीकडून नावाचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला जाणार आहे. दिल्लीत राज्यसभेच्या जागांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारांची नावं २८ फेब्रुवारीला जाहीर करण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांचाही कार्यकाळ संपत आहे. महायुतीचा मित्रपक्ष म्हणून रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून संधी देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. तर प्रितम मुंडे यांचीही राज्यसभेवर वर्णी लागू शकते. भागवत कराड यांना पुन्हा संधी दिली जाणार का याकडे पहावं लागेल. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या धैर्यशील पाटील आणि रावसाहेब दानवे हेसुद्धा राज्यसभेच्या शर्यतीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.