Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओला-उबरला पर्याय आला! स्वस्त दरात सुरक्षित प्रवास देणारे 'भारत टॅक्सी' अ‍ॅप आज होणार लाँच; जाणून घ्या सर्व माहिती

ओला-उबरला पर्याय आला! स्वस्त दरात सुरक्षित प्रवास देणारे 'भारत टॅक्सी' अ‍ॅप आज होणार लाँच; जाणून घ्या सर्व माहिती
 

जर तुम्हाला प्रवासासाठी ओला-उबरचे वाढते भाडे महाग वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशाच्या वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज 'भारत टॅक्सी अ‍ॅप' या देशातील पहिल्या सहकारी टॅक्सी सेवेचे उद्घाटन करणार आहेत. ही सेवा सहकारी (को-ऑपरेटिव्ह) मॉडेलवर आधारित आहे. याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कॅब, टॅक्सी आणि ऑटो सेवा उपलब्ध होणार आहे. भारत टॅक्सी ही फक्त टॅक्सी सेवा नाही, तर ड्रायव्हर्सच मालक असतील अशा सहकारी मॉडेलवर आधारित प्लॅटफॉर्म आहे. याची सुरुवात ६ जून २०२५ रोजी झाली असून आतापर्यंत यात ३ लाखांहून अधिक ड्रायव्हर्स आणि १ लाख ग्राहक जोडले गेले आहेत.

 
भाडे 30% स्वस्त

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत टॅक्सीचे भाडे इतर अ‍ॅप्सपेक्षा ३०% पर्यंत स्वस्त असणार आहे. त्यासोबतच ओला-उबरमध्ये पाऊस, ट्रॅफिक किंवा जास्त मागणी असताना भाडे अचानक वाढते. पण भारत टॅक्सीमध्ये 'सर्ज प्राईसिंग' नसेल. भाडे आधीच निश्चित आणि पारदर्शक असेल. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.  सध्या खाजगी कंपन्यांमध्ये ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईतून मोठे कमिशन द्यावे लागते. पण 'भारत टॅक्सी'मध्ये कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही. संपूर्ण भाडे थेट ड्रायव्हरच्या खात्यात जमा होईल. या प्लॅटफॉर्ममध्ये प्रत्येक ड्रायव्हरला ५ शेअर्स दिले जातील, त्यामुळे तेच या कंपनीचे भागधारक आणि मालक असतील. फक्त एक अल्प मेंबरशिप फी द्यावी लागेल, जी ते दिवसाला, आठवड्याला किंवा महिन्याला भरू शकतात.

ड्रायव्हरला रोज फक्त 30 रुपये फी
या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी ड्रायव्हरला दररोज फक्त ३० रुपये फी द्यावी लागेल. तर दुसरीकडे, ओला आणि उबरसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक राइडवर कमिशन कापले जाते, ज्यामुळे ड्रायव्हर्सना कमी कमाई मिळते आणि अनेकदा नुकसानही होते. भारत टॅक्सीमध्ये मात्र कमिशन नाही, त्यामुळे ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईचा पूर्ण फायदा मिळणार आहे.
भारत टॅक्सी कशी काम करते?

या अ‍ॅप वापरकर्त्यांना कॅब, टू-व्हीलर टॅक्सी, ऑटो आणि मेट्रो तिकीट बुकिंग असे अनेक पर्याय उपलब्ध होतात. म्हणजेच प्रवासासाठी सर्व सेवा एकाच अ‍ॅपमध्ये मिळतात. या अ‍ॅपमध्ये SOS सेफ्टी फीचर देखील देण्यात आले आहे. हा एक आपत्कालीन बटन असून, एका क्लिकमध्ये मदतीचा संदेश पाठवता येतो. वापरकर्ते या फीचरमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींचा नंबर सेट करू शकतात, ज्यांना तात्काळ लोकेशन आणि अलर्ट पाठवला जातो.

विमा सुरक्षा
ड्रायव्हर्सच्या सुरक्षिततेसाठीही विशेष सुविधा दिल्या जातील. त्यांना ५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा आणि ५ लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा मिळणार आहे. तसेच, नवीन गाडी खरेदी करण्यासाठी सोप्या हप्त्यांवर कर्जाची सुविधा दिली जाईल. त्यामुळे ड्रायव्हर्स स्वतःची गाडी घेऊन आत्मनिर्भर बनू शकतील. सुरुवातीला ही सेवा दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू होणार असून, पुढे मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तारली जाईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.