सांगली : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत प्रशासनातील डिजिटल कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शकता, गती आणि लोकाभिमुख सेवा देण्यात सांगली जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधल्याची नोंद राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांचे ७ प्रमुख निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यात कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, 'आपले सरकार' प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्स अॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा समावेश होता. या सर्वंकष मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आली, तर सांगली जिल्हा परिषदेने १९५ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला.निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालयांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याच्या कामगिरीमुळे प्रशासनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे फाईलींचा निपटारा वेगवान झाला, डॅशबोर्डद्वारे कामकाजाचे अचूक वेळेचे निरीक्षण शक्य झाले, तर नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी व्हॉट्स अॅप चॅटबॉट आणि 'आपले सरकार' पोर्टल प्रभावी ठरले. योजनांची अंमलबजावणी, मालमत्ता नोंदी आणि विकास कामांचे नियोजन यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कामात पारदर्शकता आणि अचूकता वाढली आहे. राज्य शासनातर्फे सर्व विजेत्या जिल्हा परिषदांचा लवकरच गौरव करण्यात येणार आहे. या यशामुळे जिल्ह्यातील प्रशासनाला नवी उभारी मिळाली आहे. भविष्यातही डिजिटल उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.