मुंबई :- रुग्णवाहिकांनाच मरणकळा
संख्या अपुरी, इंधनासाठी निधी नाही; रुग्णांची परवड
मुंबई राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांचा भार पेलणारी मुंबईतील सार्वजनिक रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्णवाहिकांची संख्या अपुरी आहे. सेवेतील ८० टक्क्यांहून अधिक रुग्णवाहिकांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. देखभाल निधीलाही ओहोटी लागली असून, सेंट जॉर्जेसमध्ये इंधनासाठीही निधी नसल्याची वेळ आली आहे.जेजे, कामा, सेंट जॉर्जेसमध्ये सरकारी, सीएसआर तसेच दात्यांकडून रुग्णवाहिका मिळतात.
रुग्णवाहिकांच्या सेवासुविधांसंदर्भात पाहणी केली असता, काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. सेंट जॉर्जेसमधील पाचपैकी दोन रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत, मात्र त्यांचेही ब्रेक लागत नाहीत. तीन
रुग्णवाहिका बिघाडामुळे तीन महिन्यांपासून बंद आहेत. दुरुस्ती निधीच्या गंगाजळीत अवघे एक हजार ९०० रु. आहेत. कामा रुग्णालयात अवघ्या दोन रुग्णवाहिका आहेत. 'जेजे'कडे आठ रुग्णवाहिका आहेत. मात्र रुग्णभार पाहता, अधिक रुग्णवाहिका गरजेच्या आहेत. त्यातच, अतिमहत्त्वाचे पाहुणे येणार असतील, तर निम्म्या रुग्णवाहिका त्यांच्या दिमतीसाठी ठेवण्यात येतात.
बॅलार्ड पिअर येथील पेट्रोलपंपासोबत कंत्राटानुसार इंधन भरले जाते. एका रुग्णवाहिकेसाठी दरमहा ३० ते ३५ हजार रु.चे इंधन लागते. खात्यात एक हजार ९०० रुपये राहिल्याने इंधन कुठून भरायचे, हा प्रश्नही आहे.
जेजेसाठी अतिरिक्त उपलब्धता
जेजे रुग्णालयाची सुपरस्पेशालिटी इमारत तयार झाल्यानंतर, तिथे अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
ऑडिट गरजेचे
चालकांनी 'रुग्णवाहिका देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित पाहायला हवी, अशी अपेक्षा प्रशासन व्यक्त करते. तर 'किती वर्षे जुन्या रुग्णवाहिका चालवायच्या?' असा प्रश्न चालक करतात. वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णवाहिकांचे ऑडिट करण्याची गरज आहे. दर पाच वर्षांनंतर नव्या रुग्णवाहिका आवश्यक आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.