उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यावर धनखड पहिल्यांदाच बोलले, ''प्रकृती अस्वास्थामुळे नव्हे तर...''
नवी दिल्ली: देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. आपण प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा दिलाच नव्हता असा गौप्यस्फोट धनखड
यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तत्कालीन
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी
राजीनामा दिला. त्यावेळी प्रकृती बरी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते.
मात्र, आता स्वतः धनखड यांनीच या कारणावरुन पडदा बाजूला सारल्याने
देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "मी आजारी असल्यामुळे राजीनामा दिला
नव्हता," असे वक्तव्य धनखड यांनी केल्याने आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.
राजीनाम्याचं कारण काय?
राजस्थानमधील सादुलपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना धनखड यांनी आपल्या राजीनाम्याबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, "जेव्हा मी उपराष्ट्रपतीपद सोडले, तेव्हा मी कधीही आजारी असल्याचा उल्लेख केला नव्हता. मी फक्त आरोग्याला महत्त्व देण्याबाबत बोललो होतो. पहिलं सुख हे निरोगी असण्यात आहे, त्यामुळे मी आरोग्याशी कधीही तडजोड केली नाही." मात्र, धनखड यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जगदीप धनखड आजारी नव्हते मग संवैधानिक पदावरून पायउतार होण्याइतपत मोठे कारण काय होते? हा प्रश्न आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चिला जात आहे.
विरोधकांनी केले होते आरोप...
धनखड
यांनी राजीनामा दिला तेव्हा विरोधकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले
होते. मोदी सरकारने धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा
त्यावेळी रंगली होती. आता धनखड यांनी 'आजारी नव्हतो' असे म्हटल्याने,
त्यांच्या राजीनाम्यामागे काही 'राजकीय मजबुरी' होती की सत्ताकेंद्राकडून
आलेला दबाव, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
थेट बोलण्याचा स्वभाव भोवला?
धनखड यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले, "मी अनेकदा अशा गोष्टी बोललो ज्याचा लोकांना राग आला, पण मी नेहमी थेट बोललो." त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता? उपराष्ट्रपती असताना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सरकारशी त्यांचे मतभेद झाले होते का? हा कळीचा मुद्दा आता समोर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.