राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधनानंतर आमदार रोहित पवार हे या दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. २०१७ पासून राजकारणात सक्रिय झालेले रोहित पवार यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यभर 'युवा संघर्ष यात्रा' काढून युवकांशी संवाद साधला. त्यानंतर ते चर्चेत आले. आता राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.
वेगळी ओळख कशी निर्माण केली?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बंधू अप्पासाहेब पवार यांचे नातू, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे असा राजकीय वारसा लाभलेले आमदार रोहित पवार आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जिल्हा परिषदेतील कामकाजातून राजकारणाचा श्रीगणेशा केला. २०१७ मध्ये त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिर्सुफळ या गटातून पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्यामध्ये ते निवडून आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा अनुभव त्यांना आला. जिल्हा परिषदेतील कामाकाजाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक ही बारामतीचा सुरक्षित मतदारसंघ निवडण्याऐवजी नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ निवडला.तत्कालीन मंत्री आणि विधान परिषदेचे विद्यमान सभापती राम शिंदे यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढविला. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले. पवार घराण्याचा वारसा असल्याने राजकारणात यश मिळाल्याची प्रतिमा निर्माण न करता स्वत: काही प्रयोग कर्जत-जामखेडमध्ये राबविले. त्यासाठी राजकारणाला समाजकरणाची जोड देऊन त्यांनी या मतदारसंघात राबविलेल्या उपक्रमांची राज्यात चर्चा होत राहिली.
बारामती सोडून कर्जत-जामखेड
आमदार
रोहित पवार यांनी बारामती किंवा इतर सुरक्षित मतदारसंघ सोडून कर्जत-जामखेड
हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ निवडला. तत्पूर्वी त्यांनी सृजन
फाउंडेशन आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास या संस्थेच्या माध्यमातून विविध
उपक्रम या मतदारसंघात राबवले. खासगी कंपन्यांच्या सामजिक उत्तरदायित्व
निधीतून त्यांनी या मतदारसंघात विकासकामे केली. त्यामध्ये जलसंधारण आणि
डिजिटल शाळा हे उपक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतले. सृजन फाउंडेशन या
संस्थेद्वारे सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी शिरकाव केला. ते
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. अर्थात
सध्या त्यांचे हे पद न्यायालयीन वादात सापडले आहे. 'बारामती ॲग्रो'च्या
माध्यमातून त्यांनी या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे या मतदारसंघातील लोकसंपर्काची नाळ आता घट्ट झाली आहे.
'युवा संघर्ष यात्रा' महत्त्वाची का?
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची पडझड होत असताना या पक्षाला आश्वासक युवा चेहऱ्याची गरज होती. तेव्हा आमदार रोहित पवार यांनी राज्यभर 'युवा संघर्ष यात्रा' काढून ती पोकळी भरून काढण्याचे काम केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यांनी ८०० किलोमीटर पदयात्रा काढून पुणे, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत तरुणांच्या गाठीभेटी घेतल्या. तरुणांच्या जिव्हाळ्याचे विषय म्हणजे बेरोजगारी, कंत्राटी भरती, पेपरफुटी यांसारख्या प्रश्नांकडे त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यातून अभ्यासू, संयमी; पण आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली.
अजित पवारांच्या अपघाताचा विषय
अजित
पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेत
तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. ब्लॅक बॉक्सचा संशय, विमानात अतिरिक्त इंधन
ठेवले होते का, विमान कंपनीची पार्श्वभूमी, अपघाताच्या शेवटच्या मिनिटात
विमाचा ट्रान्सपॉन्डर बंद का झाला, मुख्य वैमानिकाचा आवाज का गायब झाला,
अशा तांत्रिक बाबींवर त्यांनी बोट ठेवले आहे. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून
या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली. नागरी उड्डाण
मंत्र्यांचा राजीनाम्याचीही मागणी केली.
पवार कुटुंबाचा राजकीय वारसदार?
आमदार रोहित पवार यांची संयत राजकारणी म्हणून प्रतिमा झाली आहे. कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते परिस्थिती हाताळत आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर या अपघाताविषयी प्रश्न उपस्थित करत असताना अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांना आधार देणारा भाऊ म्हणूनही भूमिका बजावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची धुरा खासदार सुप्रिया सुळे या दिल्ली स्तरावर सांभाळत असताना ग्रामीण महाराष्ट्रात फिरणारा नेता आणि ग्रामीण माणसांशी नाळ जोडलेला तरुण नेता म्हणून रोहित पवारांकडे पाहिले जाऊ लागले आहे. त्या अर्थाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजकीय वारसा समर्थपणे चालविणारे युवा नेतृत्व अशी आमदार रोहित पवार यांची प्रतिमा झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.