सरकारी वाहनांचा वापर केवळ शासकीय कामासाठीच करणे बंधनकारक असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क शासकीय गाडीतून लग्नाचे वऱ्हाड नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळे सौदागर परिसरात हे दृश्य पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शासकीय गाडीत लग्नाचे वऱ्हाड
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळे सौदागर परिसरात पोलिसांचे शासकीय वाहन लग्नाच्या वऱ्हाड्यांनी भरलेले दिसून आले. फुलांनी सजवलेली पोलिसांची ही शासकीय गाडी पाहून स्थानिक नागरिकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्ये कैद केली . या प्रकरामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. सामान्य जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशातून मिळणाऱ्या शासकीय सोयी-सुविधांचा असा खाजगी आणि कौटुंबिक कार्यासाठी वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शासकीय वाहनांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर करण्यास मनाई असताना हा नियम कोणी धाब्यावर बसवला ?संबंधित वाहन पोलिसांच्या कोणत्या विभागाचे आहे आणि त्यावेळेस कोणाच्या ताब्यात होते ? या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का ? या घटनेमुळे प्रशासकीय शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, रावेत परिसरातील एका वसाहतीजवळील कुत्रा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका प्राणीप्रेमीने वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.